Stuart Broad Unique Record : ब्रॉडचा अद्भुत विक्रम! कसोटीच्या इतिहासात ‘असं’ कधीच घडलेलं नव्हतं, पण… | पुढारी

Stuart Broad Unique Record : ब्रॉडचा अद्भुत विक्रम! कसोटीच्या इतिहासात ‘असं’ कधीच घडलेलं नव्हतं, पण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Stuart Broad Unique Record : जगातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांपैकी एक असलेल्या इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेटला कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्याने याआधीच निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 31) अखेरच्या कसोटी सामन्यात ब्रॉडने इतिहास रचला. आपल्या शेवटच्या कसोटीत त्याने असा विश्वविक्रम केला, जो 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणीही करू शकले नव्हते. अशा अद्भुत विक्रमाची नोंद असणार ब्रॉड हा यापुढे एकमेव क्रिकेटर असेल.

कसोटी क्रिकेटमध्ये ‘असं’ पहिल्यांदाच घडलं (Stuart Broad Unique Record)

ओव्हल मैदानावर सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजी करताना ब्रॉडने कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. या कामगिरीने त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना सुद्धा कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर कांगारू फलंदाजाची शिकार केली. अखेरच्या कसोटीत पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर षटकार आणि गोलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवण्याचा हा करिष्मा केला आहे. ब्रॉडच्या नावावर अशा दुर्मिळ विक्रमाची नोंद झाली आहे, जो पुढची अनेक वर्षे अबाधित राहिल यात शंका नाही.

‘असा’ फटकावला शेवटच्या चेंडूवर षटकार (Stuart Broad Unique Record)

वास्तविक, ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी ब्रॉडने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 81 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने फेकलेला शॉर्ट चेंडू शक्तिशाली पुल शॉट खेळून सीमापार पाठवला. त्यानंतर त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. जेम्स अंडरसन बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. यावेळी ब्रॉड नाबाद 8 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी चौथ्या दिवसाअखेर 140 धावांची भागीदारी करून कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली. मात्र सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे नशीब पालटले. 28 धावांच्या आत वॉर्नर, ख्वाजा आणि लबुशेनच्या रूपाने इंग्लंडला तीन यश मिळाले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीने 95 धावांची भागीदारी करत संघाला सांभाळले, पण पावसाने दोघांचीही लय बिघडवली.

कॅरीची शिकार करून ब्रॉडने रचला इतिहास (Stuart Broad Unique Record)

उपाहारानंतरचे सत्र पावसाने वाहून गेले आणि त्यानंतर मोईन अलीने ट्रॅव्हिस हेडला बाद करून ही भागीदारी तोडली. ही भागीदारी तुटताच इंग्लंडने सामन्यावरची आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली. कांगारूंना चौथा धक्का 264 धावांवर बसला. इंग्लिश संघाने पुढील 70 धावांत ऑस्ट्रेलियाला गुंडाळले. ख्रिस वोक्सने 4, तर मोईन अलीने 3 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी शेवटची कसोटी खेळणाऱ्या ब्रॉडलाही दोन बळी मिळाले. यादरम्यान ब्रॉडने 95 वे षटक फेकताना चौथ्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीला जॉनी बेअरस्टोच्या हाती यष्टीमागे झेलबाद केले. ही विकेट घेताच इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे हा चेंडू ब्रॉडच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा चेंडू ठरला. अशाप्रकारे त्याने 604 विकेट्स घेत आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड केला.

ॲशेस मालिकेत ब्रॉडने घेतले 22 बळी

ब्रॉड, ज्याला डावखु-या फलंदाजांचा काळ म्हटले जाते, त्याने कारकिर्दितील शेवटच्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. 2023 च्या ॲशेस मालिकेत त्याने 22 विकेट घेण्याचा पराक्रम केला. या मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क (23 विकेट्स) नंतर दुसऱ्या स्थानी राहिला. (Stuart Broad Unique Record)

चमकदार कसोटी कारकीर्द

37 वर्षीय ब्रॉड जवळपास 16 वर्षे कसोटी क्रिकेट खेळळा. वयाच्या 21 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या ब्रॉडने एकूण 167 कसोटीत 604 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने 3662 धावा केल्या. ब्रॉडची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 169 धावा आहे. त्याच्या बॅटमधून एक शतक आणि 13 अर्धशतके झळकली आहेत. गोलंदाजीदरम्यान त्याने 20 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आणि 28 वेळा एका डावात चार विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 600 बळी घेणारा तो हा जगातील दुसरा वेगवान गोलंदाज आहे. जेम्स अँडरसन पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय अँडरसनसह ब्रॉडने कसोटीत एकूण 1037 विकेट्स घेतल्या आहेत.

Back to top button