बीसीसीआयने जाहीर केली रिटेन पॉलिसी ; नव्या संघासाठी नवे नियम | पुढारी

बीसीसीआयने जाहीर केली रिटेन पॉलिसी ; नव्या संघासाठी नवे नियम

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आज आयपीएलमधील मूळच्या आठ संघासाठीची नवी रिटेन पॉलिसी जाहीर केली आहे.

आयपीएल २०२२ या पंधराव्या हंगामाच्या आधी आयपीएलमधील संघांना आपले खेळाडू रिटेन करण्याची नवी पॉलिसी बीसीसीआयने आज जाहीर केली. यानुसार इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल मधील मूळचे आठ संघ आगामी मेगा ऑक्शनच्या आधी चार खेळाडू रिटेन करु शकतात. तसेच नव्या दोन संघाना ऑक्शनच्या आधी तीन खेळाडूंना घेण्याची संधी मिळणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी दुपारी बीसीसीआयने सर्व फ्रेंचायजींना ई मेल पाठवून या बाबत अधिकृत कळविले. यानुसार सध्याच्या ८ संघाना ४ खेळाडूंना रिटेन करण्याची संधी असेल. तसेच त्यानंतर नव्या २ संघांना लिलावाच्या आधी ३ खेळाडूंना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय बीसीसीआयने आयपीएल २०२२ हंगामासाठी सर्व संघासाठी वेतन कॅप ९० कोटी ठरविले आहे. सध्याच्या ८ संघाना खेळाडू रिटेन करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर नव्या २ संघांना १ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ पर्यंत तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्यात आली आहे.

या पाॅलिसी दरम्यान बीसीसीआयने असे देखिल म्हटले आहे की, जुन्या फ्रेंचायजींना ३ पेक्षा जास्त भारतीय (कॅप/अनकॅप) खेळाडू रिटेन करु शकत नाही. दोन विदेशी खेळाडूंपेक्षा अधिक खेळाडू रिटेन करु शकत नाही. या पॉलिसीमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, एक संघ दोन पेक्षा अधिक अनकॅप खेळाडूंना रिटेन करु शकत नाही.

नवीन दोन संघांचा विचार केला तर त्यांना लिलावाच्या आधी दोन भारतीय आणि एका विदेशी खेळाडूला निवडण्याची संधी दिली जाणार आहे. या शिवाय नवे संघ लिलावाच्या आधी फक्त एक अनकॅप खेळाडूची निवड करु शकतात.

दरम्यान बोर्डाने रिटेन पॉलिसी सोबत प्रत्येक खेळाडूच्या वेतनाचा देखिल उल्लेख केला आहे. पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी १२ कोटी रुपये, तीसऱ्या खेळाडूसाठी ८ कोटी रुपये आणि ४ थ्या खेळाडूसाठी ६ कोटी रुपये ठरविण्यात आले आहेत.

तीन रिटेनच्या स्थितीमध्ये पहिल्या खेळाडूची फि १५ कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी ११ कोटी रुपये आणि तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी रुपये किंमत ठरविण्यात आली आहे.

Back to top button