FIFA Women’s World Cup : महिला वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडची विजयी सलामी; नॉर्वेचा १-० ने पराभव | पुढारी

FIFA Women's World Cup : महिला वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडची विजयी सलामी; नॉर्वेचा १-० ने पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडने गुरुवारी (दि. २०) महिला फुटबॉल विश्वचषकात प्रथमच विजयाची चव चाखली. हॅना विल्किन्सनने केलेल्या गोलमुळे न्यूझीलंडने नॉर्वेला १-० ने पराभूत केले. ‘अ’ गटातील या सामन्यात दोन्ही संघांना पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही. नॉर्वेने आक्रमक खेळी करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. परंतु, न्यूझीलंडच्या भक्कम बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरवले. (FIFA Women’s World Cup)

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये न्यूझीलंडला नॉर्वेची बचावफळी भेदण्यात यश आले. दुसऱ्या हाफच्या ४८व्या मिनिटाला हॅना विल्किन्सनने बॉक्समधून गोल करत न्यूझीलंडला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कमी करण्यासाठी नॉर्वेने अनेक चढाया केल्या. परंतु, त्यांना गोल करण्यात यश आले नाही. (FIFA Women’s World Cup)

सामना पाहण्यासाठी ४२.००० प्रेक्षकांची उपस्थिती

हा सामना पाहण्यासाठी ईडन पार्क स्टेडियमवर ४२,००० हून प्रेक्षक उपस्थित होते. न्यूझीलंडमध्ये फुटबॉल सामन्यासाठी ही विक्रमी संख्या आहे. दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्सही स्टेडियममध्ये उपस्थित होते. न्यूझीलंडच्या महिला संघाने यापूर्वीच्या पाच विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु त्यांना एकही सामना जिंकता आलेला नव्हता.

ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंडचा १-० असा पराभव

ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यांनी आयर्लंडचा १-० असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या स्टेफ कॅटलीने सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. उर्वरित सामन्यात आयर्लंडला ही आघाडी कमी करता आली नाही.

हेही वाचा;

Back to top button