

लंडन; उदय बिनीवाले : टेनिस विश्वात अत्यंत मान आणि प्रतिष्ठा असलेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या चषकाबाबतही क्रीडा रसिकांत कुतूहल, आकर्षण असते. पुरुष आणि महिला विजेत्यास जे चषक मिळतात ते शुद्ध चांदीचे असतात. पुरुष विजेत्याचा कप 18 इंचांचा असून, परीघ 7.5 इंच आहे. या कपावर सर्व गत विजेत्यांची नावे आणि संबंधित वर्ष कोरलेले असते. प्रत्यक्षात विजेत्यास या कपाची 75 टक्के लहान प्रतिकृती बहाल करण्यात येते. महिला विजेत्या खेळाडूला 18.75 इंच परिघाची थाळी-तिला रोजमेरी डिस्क म्हणतात, वरीलप्रमाणे (14 इंच थाळी) प्रदान करण्यात येते. (Wimbledon 2023)
विम्बल्डन सेंटर कोर्ट – 101 :
स्पर्धेचे हे 136 वे वर्ष आहे. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे विम्बल्डन स्टेडियममधील ऐतिहासिक आणि मानाच्या सेंटर कोर्टची 'शंभरी' पूर्ण झाली आहे..!
(Wimbledon 2023)
सेंटर कोर्ट :
हीच ती जागा जिला देदीप्यमान इतिहास आहे. या कोर्टवर खेळायला मिळणे हे मोठे भाग्य तसेच सन्मान समजला जातो. या सेंटर कोर्टने केन रोजवाल, रॉड लेव्हर, बिली जिन किंग, पॅट संप्रस, जिमी कॉनर्स, ख्रिस एव्हर्ट, स्टेफी ग्राफपासून फेडरर, नदाल, मारिया शारापोव्हा, जोकोव्हिच आणि मेदवेदेव ते अगदी बार्टी, स्विटेक ते हल्ली एमा राडुकुनू, हजारो खेळाडूंना बहरताना, मोठे होताना पाहिलंय. तसेच अनेक वर्षे मैदान गाजवलेल्या दिग्गज खेळाडूंना निरोपही दिलाय.
अनेक प्रसंगांत विजेत्यांचे आनंदाश्रू टिपलेत आणि पराभूतांचे रडूही अनुभवले आहे. वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष, उद्योगपती, अभिनेते, खेळाडू यांना आवर्जून खेळाचा आनंद लुटताना त्यांना झालेल्या आनंदास ही जागा साक्ष आहे. अशा या विम्बल्डन स्टेडियममधील मुख्य सेंटर कोर्टने शंभरी पार केली आहे. त्या अनुषंगाने मुख्य अंपायरची खुर्ची नव्या स्वरूपाची असेल. तसेच अंपायर आणि कोर्ट स्टाफचा गणवेश संपूर्ण नवा व आकर्षक असेल. टेनिस संग्रहालय अधिक अद्ययावत स्वरूपात दिसेल. स्पर्धा नजीक आल्याने सर्व दिग्गज खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले असून, त्यांनी सरावदेखील सुरू केला आहे.
सोडत (ड्रॉ) :
आज सामन्याच्या लढतीची सोडत (ड्रॉ) काढण्यात आली. प्राथमिक फेरीत अनपेक्षित धक्के न बसता प्रमुख खेळाडू आपापल्या लढती जिंकून पूढे वाटचाल करतील, अशी अपेक्षा आहे. तथापि, डॉमिनिक थिएम वि. सिटसिपास ही पहिल्या फेरीतील लढत उत्सुकतेची असेल. तसेच बेलिंडा बेन्सिक वि. केटी स्वान व कोको गॉफ वि. सोफिया केनीन, पेट्रा क्विंटोवा वि. जस्मिन पालोनी या टेनिस लढती रोमहर्षक व तुल्यबळ होणार हे निश्चित.
हेही वाचा;