ICC ODI WC 2023 : पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यास आयसीसीचा ‘प्लॅन बी’ तयार | पुढारी

ICC ODI WC 2023 : पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यास आयसीसीचा ‘प्लॅन बी’ तयार

दुबई; वृत्तसंस्था : आगामी आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचा सहभाग अद्याप अनिश्चित असून या पार्श्वभूमीवर आयसीसीने आपला ‘प्लॅन बी’ तयार केला आहे. ऐन मोक्याच्या क्षणी पाकिस्तानने माघार घेतली तर पात्रता फेरीतील तिसर्‍या संघाला संधी दिली जाईल, अशी आयसीसीची रणनीती आहे. (ICC ODI WC 2023)

2023 आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असून, दि. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील सलामीची व अंतिम फेरीची लढत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. पाकिस्तानने सहभाग घेतला नाही तर झिम्बाब्वेतील पात्रता फेरीत तिसर्‍या क्रमांकावरील संघाला आगामी विश्वचषकात संधी मिळू शकते. (ICC ODI WC 2023)

भारताने यापूर्वी पाकिस्तानमध्ये जाणे सातत्याने टाळले असून, यामुळे हायब—ीड मॉडेल सादर करत त्यानुसार पाकिस्तान व श्रीलंकेत आशिया चषकातील सामने भरवण्याची संकल्पना मांडली गेली आणि त्यावर शिक्कामोर्तब देखील झाले आहे. भारताने यापूर्वी 2008 साली पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला, तर पाकिस्तानने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भारत दौरे केले आहेत. पूर्वनियोजित रूपरेषेनुसार, पाकिस्तानचा संघ अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बंगळूर व हैदराबाद या पाच ठिकाणी आपले विश्वचषकातील सामने खेळणार आहे.

हेही वाचा;

Back to top button