ICC Rankings : वनडे रँकिंगमध्ये उलथापालथ, निकोलस पूरन-सिकंदर रझाचा धमाका | पुढारी

ICC Rankings : वनडे रँकिंगमध्ये उलथापालथ, निकोलस पूरन-सिकंदर रझाचा धमाका

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या एक दिवसानंतर आयसीसीने नवीन रँकिंग जाहीर केली आहे. दरम्यान, कसोटी क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. पण सध्या विश्वचषक पात्रता फेरीचे सामने खेळले जात असून यामध्ये जगभरातील दहा संघ एकमेकांशी स्पर्धा करत होते. मात्र आता त्यांची संख्या सहा झाली आहे. यातील दोनच संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. पण या सध्याच्या क्वालीफायर सामन्यांनंतर वनडे क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत.

पूरनची ODI रँकिंगमध्ये 13 स्थानांची झेप

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत निकोलस पूरनला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याने पात्रता फेरीत सलग दोन शतके झळकावली. या लक्षवेधी खेळींचा त्याला जबरदस्त फायदा झाला. या दोन शतकांनंतर पूरनने क्रमवारीत 13 स्थानांनी झेप घेत अव्वल 20 मध्ये प्रवेश केला आहे. पूरन विश्वचषक पात्रता फेरीच्या गट टप्प्यात नेदरलँड्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभूत होण्यापूर्वी 115 आणि नाबाद 104 धावांसह 296 धावांसह दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. आता नव्या आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत तो 19व्या स्थानावर पोहोचला आहे. पुरणने सर्वाधिक 15 षटकार ठोकले आहेत.

रझाने अष्टपैलू कामगिरीने केले चकित

झिम्बाब्वेच्या स्टार खेळाडूंपैकी एक असलेल्या सिकंदर रझाने वनडे फलंदाजी क्रमवारीत सात स्थानांनी प्रगती केली आहे. तो 27व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने नेदरलँडविरुद्ध नाबाद 102 धावांची खेळी केली. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध 68 आणि अमेरिकेविरुद्ध 48 धावा केल्या होत्या. चार सामन्यांत केवळ तीन वेळा फलंदाजी करूनही तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. रझाने आपल्या गोलंदाजीनेही प्रभाव पाडला आहे. त्याने विश्वचषक पात्रता फेरीत आठ विकेट्स घेतल्या असून तो स्पर्धेत सहाव्या स्थानी आहे. दरम्यान, रझाने वनडे अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वल आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.

टीम इंडियाचे तीन खेळाडू टॉप 10 मध्ये

आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल खेळाडूंमध्ये बाबर आझमने पहिल्यास्थानी आहे. त्याचे रेटिंग 886 आहे. द. आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर ड्युसेन 777 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी पाकिस्तानच्या फलंदाजांनी कब्जा केला आहे. फखर जमान 755 रेटिंगसह तिस-या तर इमाम-उल-हक चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर आहे. गिलचे रेटिंग आता 738 वर गेले आहे. दरम्यान, विराट कोहलीला एक स्थान गमवावे लागले असून त्याची आठव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे.

Back to top button