Asia Cup 2023 : आशिया चषकापूर्वी रोहित, विराटला महिनाभर ब्रेक?

Asia Cup 2023 : आशिया चषकापूर्वी रोहित, विराटला महिनाभर ब्रेक?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौर्‍याला सुरुवात करणार आहे. या दौर्‍याची सुरुवात 12 ते 16 जुलै आणि 20 ते 24 जुलैदरम्यान दोन कसोटी सामन्यांनी होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळवली जाईल. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे; पण टी-20 संघाची घोषणा करण्यात आली नाही. कसोटी आणि वन-डे मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या खांद्यावर फलंदाजीचा भार असेल; पण या मालिकेनंतर रोहित आणि विराट यांना आशिया चषकापर्यंत महिनाभर ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. (Asia Cup 2023)

भारतीय संघ 1 ऑगस्ट रोजी विंडिज विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यानंतर 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान पुन्हा पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेतून बाहेर राहू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, या दोन्ही मोठ्या खेळाडूंनी 2022च्या टी-20 विश्वचषकानंतर एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तेव्हापासून या फॉरमॅटमध्ये फक्त हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसत आहे. तसेच विंडिजविरुद्धच्या मालिकेत आयपीएल स्टार यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंह यासारख्या नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. (Asia Cup 2023)

या वर्षी होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकावर विराट आणि रोहितचे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना 8-9 महिन्यांपासून टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. 13 ऑगस्टनंतर टीम इंडियाला आयर्लंडचा छोटा दौराही करायचा आहे, ज्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यामध्येही हार्दिकच्या नेतृत्वाखाली युवा संघ मैदानात उतरेल यात शंका नाही. त्यानंतर 31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे.

पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये होणार असून टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. आशिया कपमध्ये रोहित आणि विराट पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसतील. त्याआधी दोघेही एक महिन्यापेक्षा जास्त विश्रांती घेऊ शकतात.

हेही वाचा;

logo
Pudhari News
pudhari.news