MPL 2023 : सोलापूर रॉयल्स संघाचा पहिला विजय

MPL 2023 : सोलापूर रॉयल्स संघाचा पहिला विजय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आठव्या दिवशी दुसर्‍या सामन्यात सुनील यादव (3-32), प्रणय सिंग (2-29), प्रथमेश गावडे (2-31) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसह स्वप्निल फुलपगार (68 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सोलापूर रॉयल्स संघाने पुणेरी बाप्पा संघाचा 3 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणेरी बाप्पाच्या फलंदाजांनी सुरुवातीला थोडीशी संथ सुरुवात केली. पवन शहा 2 धावांवर खेळत असताना सोलापूरच्या प्रथमेश गावडेने झेलबाद करून पुण्याच्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर रोहन दामले व यश क्षीरसागर यांनी 15 चेंडूंत 24 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण प्रथमेश गावडेने यश क्षीरसागरला झेल बाद करून वैयक्तिक दुसरा बळी टिपला व संघाला दुसरा धक्का दिला. हर्ष सांघवी (1 धाव) चोरटी धाव घेत असताना सोलापूरच्या अवधूत दांडेकरने त्याला धावचित बाद केले व त्यामुळे पुणेरी बाप्पा संघ 6 षटकांत 3 बाद 34 धावा असा अडचणीत सापडला. (MPL 2023)

संयमी खेळी करणार्‍या रोहन दामले (24 धावा) ला सोलापूरच्या प्रणय सिंगने पायचित बाद करून आणखी एका विकेटची भर घातली. वैभव चौगुले (22 धावा) व ऋतुराज गायकवाड (25 धावा) यांना एकापाठोपाठ बाद करून पुण्याची अडचण आणखीन वाढवली. पुणेरी बाप्पा संघाला 20 षटकांत 8 बाद 140 धावांचे आव्हान उभारून दिले.

140 धावांचे आव्हान सोलापूर रॉयल्स संघाने 19.1 षटकात 7 बाद 141 धावा करून पूर्ण केले. सोलापूरच्या यश नहरला पुण्याच्या सचिन भोसलेने दुसर्‍याच चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर स्वप्निल फुलपगारने संयमी खेळी करत 52 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 68 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वप्निलने अवधूत दांडेकर (20 धावा) च्या साथीत 27 चेंडूंत 32 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली.

अवधूत दांडेकरला शुभम कोठारीने यष्टिचित बाद केले. पण स्वप्निलने एक बाजू सांभाळत विशांत मोरे (23 धावा)च्या साथीत तिसर्‍या गड्यासाठी 45 चेंडूंत 50 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अखेरच्या षटकात 6 चेंडूंत 3 धावांचे आव्हान सोलापूर रॉयल्स संघाने 19.1 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 141 धावा करून विजय मिळवला.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news