

पुढारी ऑनलाईन डेस्क : ind vs wi test rescheduled : टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या या दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. मात्र या मालिकेच्या वेळापत्रकात बदल व्हावा अशी मागणी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने केल्याचे समजते आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी (IND vs WI) 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवली जाणार आहे. विंडिज क्रिकेट बोर्डाला या कसोटीची तारीख बदलायची आहे. वास्तविक, वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये आहे आणि हरारे येथे 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी खेळत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. जर विंडिजचा संघ अंतिम फेरीत पोहचला तर त्यांचा संघ 10 जुलैला मायदेशात परतेल. अशा परिस्थितीत त्यांना 12 जुलैपासून सुरू होणा-या कसोटीच्या तयारीसाठी दोनच दिवस मिळणार आहेत. परिणामी टाईट शेड्युलमुळे संघाच्या प्रदर्शन खराब होईल अशी भीती विंडिज बोर्डाला भेडसावत आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याची कसोटीची पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (ind vs wi test rescheduled)
विंडिज बोर्ड मर्यादित षटकांच्या आणि कसोटी फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या संघांना मैदानात उतरवते. पण असे काही खेळाडू आहेत जे दोन्ही फॉरमॅटमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये जेसन होल्डर, काइल मेयर्स, रोस्टन चेस आणि अल्झारी जोसेफ यांच्या नावाचा समावेश आहे. यावर बोर्डाने म्हटले आहे की, 'संघात असे अनेक महत्त्वाचे खेळाडू आहेत जे एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही सामने खेळतात. अशा परिस्थितीत 9 जुलै रोजी होणाऱ्या क्वालिफायर सामन्याच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा संघ पोहोचला तर 12 जुलैपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीची तारीख पुढे ढकलावी लागेल.' (ind vs wi test rescheduled)
विंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा जूनच्या अखेरीस होऊ शकते. कसोटी मालिकेत काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सरफराज खान, यशस्वी जैस्वाल यांच्या नावाचा समावेश आहे. उभय संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि 5 सामन्यांची टी-20 मालिकाही खेळली जाणार आहे. दरम्यान, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 11 जूनलाच संपला असला तरी, त्यानंतर टीम इंडियाचे अनेक मोठे आणि स्टार खेळाडू तेथून मायदेशी परतलेच नाहीत. त्यामुळे ते इंग्लंडहून थेट वेस्ट इंडिजला रवाना होणार असल्याचे मानले जात आहे. (ind vs wi test rescheduled)