HS Prannoy : एचएस प्रणॉयचा तैपेई ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश | पुढारी

HS Prannoy : एचएस प्रणॉयचा तैपेई ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने (HS Prannoy) तैपेई ओपन 2023 च्या (Taipei Open) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 9व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय खेळाडूने पुरुष एकेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोचा 21-9, 21-17 असा पराभव करून बीडब्ल्यूएफ सुपर 300 स्पर्धेच्या पुढील फेरी गाठली.

प्रणॉयने (HS Prannoy) अलीकडेच मलेशिया मास्टर्स 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर तो तैपेई ओपनमध्ये (Taipei Open) उतरला असून येथेही त्याने आपला चमकदार फॉर्म कायम ठेवला आहे. गुरुवारी राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात त्याने इंडोनेशियन खेळाडू विरुद्ध पहिला गेम एकतर्फी जिंकत शानदार सुरुवात केली. मात्रा त्याला सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धी टॉमी सुगियार्तोने कडवी झुंज दिली. प्रणॉय (HS Prannoy) 10-3 ने मागे पडला. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूने जबरदस्त कमबॅक करून गेममध्ये 15-15 ने बरोबरी साधली.

यानंतर 36 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने (HS Prannoy) आपल्या लयीचा फायदा घेत इंडोनेशियन खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही आणि सरळ गेममध्ये सामना जिंकून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. पुढील सामन्यात त्याची हाँगकाँगच्या एनजी काई लाँग एंगस याच्याशी लढत होणार आहे.

दुसरीकडे, 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यपला चिनी तैपेईच्या सु ली यांगकडून 21-16, 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत भारताच्या हाती निराशा आली. तान्या हेमंतला प्री-क्वार्टर फायनलमधून आपला गाशा गुंडाळावा लागला. तिचा जागतिक क्रमवारीतील चौथ्या स्थानी असणा-या चायनीज तैपेईच्या ताई त्झू यिंग हिने 21-11, 21-6 असा पराभव केला. तर रोहन कपूर आणि एन सिक्की रेड्डी या भारतीय मिश्र दुहेरी जोडीला 16 च्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय जोडीला चायनीज तैपेईच्या चिऊ झियांग चिएह आणि लिन झियाओ मिन यांच्याकडून 21-13, 21-18 ने पराभव पत्करावा लागला.

Back to top button