ICC Rankings : जो रुट बनला अव्वल कसोटी फलंदाज, लॅबुशेनला टाकले मागे | पुढारी

ICC Rankings : जो रुट बनला अव्वल कसोटी फलंदाज, लॅबुशेनला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटने (joe root) आयसीसी कसोटी क्रमवारीत (icc test batting rankings) मोठी प्रगती केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनला (marnus labuschagne) मागे टाकून इंग्लिश फलंदाजाने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. रूटने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात 30वे शतक झळकावले, तर दुसऱ्या डावातही त्याने महत्त्वपूर्ण 46 धावा केल्या. याच सामन्यात लॅबुशेनने (marnus labuschagne) निराशा केली. तो पहिल्या डावात 0 आणि दुस-या डावात 13 धावा करून बाद झाला. याचा फटका त्याला क्रमवारीत बसला. त्यामुळे त्याची पहिल्या स्थानावरून तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे.

तिसर्‍या क्रमांकावर असलेला ट्रॅव्हिस हेड एक स्थानाने घसरून चौथ्या तर दुसऱ्या स्थानावर असलेला स्टीव्ह स्मिथ चार स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर आला आहे. केन विल्यमसन आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. एजबॅस्टन कसोटीत 141 आणि 65 धावांची खेळी साकारणारा उस्मान ख्वाजा क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय फलंदाज अव्वल 10 मध्ये आहे.

रॉबिन्सन पहिल्या पाचमध्ये

एजबॅस्टन कसोटीत पाच विकेट्स घेत इंग्लिश वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने पहिल्या पाचमध्ये प्रवेश केला आहे. जेम्स अँडरसन दुसऱ्या तर स्टुअर्ट ब्रॉड नवव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्यानंतरही तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे, तर नॅथन लायने सामन्यात आठ विकेट्स घेत एका स्थानाने प्रगती केली असून तो आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आर अश्विन अजूनही जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे.

अमेरिकेच्या नेत्रावलकरने रचला इतिहास

अमेरिकेच्या सौरभ नेत्रावलकरने विश्वचषक पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात चार विकेट घेत एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल 20 मध्ये प्रवेश केला. 18व्या क्रमांकावर असलेला नेत्रावलकर हा टॉप 20 मध्ये स्थान मिळवणारा पहिला अमेरिकन गोलंदाज आहे. जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज आणि मिचेल स्टार्क अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

ओमानचा झिशान मकसूद एकदिवसीय अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिल्या तीनमध्ये पोहोचला आहे. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आणि एक विकेटही घेतली. शाकिब अल हसन या यादीत अव्वल, तर मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानावर आहे.

Back to top button