Ashes Test : आयसीसीचा ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला दणका, आर्थिक दंड ठोठावत डब्ल्यूटीसीच्या गुणांना कात्री | पुढारी

Ashes Test : आयसीसीचा ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला दणका, आर्थिक दंड ठोठावत डब्ल्यूटीसीच्या गुणांना कात्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Fined : एजबॅस्टन कसोटीत (edgbaston test) स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडला (England) मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या मानधनातील 40 टक्के रकमेला आणि डब्ल्यूटीसीच्या (WTC) 2-2 गुणांना कात्री लावली आहे. सध्या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिका सुरू आहे. यतील पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी (WTC) गुणतालिकेत 12 गुणांसह खाते उघडले, परंतु आता आयसीसीच्या (ICC) दंडात्मक कारवाईनंतर त्यांच्या खात्यात फक्त 10 गुण जमा झाले आहेत. तर इंग्लंडला खात्यात 4 ऐवजी 2 गुण मिळाले आहेत.

एजबॅस्टन (बर्मिंगहॅम) येथे झालेल्या ॲशेस मालिकेतील (Ashes 2023) पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. यावबरोबर त्यांनी डब्ल्यूटीसीच्या तिस-या पर्वाची शानदार सुरुवात केली. हा सामना अतिशय रंजक झाला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ विजयी होईल याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती. पण रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत इंग्लिश संघाच्या तोंडचा घास हिरावून घेतला.

पण या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी आयसीसीने ऑस्ट्रेलियासह इंग्लंडला धक्का दिला आहे. आयसीसीने (ICC) स्लो ओव्हर रेटच्या (slow over rates) बाबतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे दोन गुण वजा केले आहेत. यासोबतच दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या मॅच फीच्या 40 टक्के दंडही ठोठावला आहे. सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे दोन गुण वजा केले आहेत. परंतु इंग्लंडच्या खात्यात अजून एकही गुण नाही, त्यामुळे जेव्हा कधी इंग्लंड पहिला सामना जिंकेल तेव्हा जमा होणा-या गुणांमधून दोन गुणांना कात्री लावली जाईल. त्याचा परिणाम आता फारसा दिसत नसला तरी आगामी काळात डब्ल्यूटीसीचे (WTC) सामने सुरू असताना ते खूप घातक ठरू शकते.

आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, कोणत्याही संघाला विजयानंतर 12, सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना चार-चार तर सामना बरोबरीत सुटला तर सहा गुण दिले जातात. ऑस्ट्रेलियाला आता 12 ऐवजी दहा गुण मिळाले आहेत. डब्ल्यूटीसीमध्ये गुण महत्त्वाचे आहेत, परंतु बदललेल्या नियमांनुसार सामने जिंकण्याच्या टक्केवारीच्या आधारे रँकिंग दिले जाते.

डब्ल्यूटीसी फायनलनंतर भारतासह ऑस्ट्रेलियाला दंड (ICC Fined)

कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने या महिन्याच्या सुरुवातीला ओव्हल येथे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. दरम्यान, या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि भारतावर कारवाई केली होती. दोघांनाही मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता.

डब्ल्यूटीसी 2023-2025 ची सुरुवात अॅशेस मालिके

डब्ल्यूटीसीचे तिसरे पर्व सुरू झाले आहे, ज्याची सुरुवात अॅशेस मालिकेपासून झाली आहे. याआधी, जेव्हा 2019 ते 2021 या कालावधीत पहिली डब्ल्यूटीसी स्पर्धा खेळवण्यात आली तेव्हा भारत आणि न्यूझीलंडने अंतिम फेरीत गाठली होती, ज्यात न्यूझीलंडने विजेतेपद मिळवले. यानंतर दुसऱ्यांदा 2021 ते 2023 या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीत पोहोचले. सलग दुस-यांदा भारताला जेतेपद पटकाण्याच्या संधीने हुलकावणी दिली आणि ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मात देऊन ट्रॉफीवर नाव कोरले.

टीम इंडियाची नवी मोहिम 12 जुलैपासून

टीम इंडिया 12 जुलैपासून आपल्या नव्या मोहिमेची सुरुवात करेल. डब्ल्यूटीसी अंतर्गत पहिली कसोटी मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध खेळण्यास भारतीय संघ सज्ज आहे. लवकरच संघ विडिज दौ-यासाठी रवाना होणार आहे. सलग दोन वर्षे सर्व देश आपापले सामने खेळतील आणि त्यानंतर 2025 मध्ये अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. स्पर्धेचा अंतिम सामना जून 2025 मध्ये लंडनमधील लॉर्ड्स येथे रंगणार आहे. त्यानंतर नवीन डब्ल्यूटीसी चॅम्पियन मिळेल.

Back to top button