Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे लिसेस्टरशायरकडून खेळणार | पुढारी

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे लिसेस्टरशायरकडून खेळणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे 18 महिन्यांनंतर भारताच्या कसोटी संघात परतला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अजिंक्यने भारताकडून चांगली कामगिरी केली. यामुळे वेस्ट इंडिज दौर्‍यावर त्याची निवड नक्की मानली जात आहे, पण अजिंक्यला इंग्लंडमधूनही मागणी आली असून विंडीज दौर्‍यानंतर तो लगेच कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. अजिंक्य रहाणे लिसेस्टरशायर संघाशी करारबद्ध झाला आहे. (Ajinkya Rahane)

अजिंक्य रहाणेने जानेवारीमध्ये लिसेस्टरशायरसाठी करार केला होता आणि आयपीएल संपल्यानंतर, तो लिसेस्टरशायर संघासाठी आठ प्रथम श्रेणी सामने आणि संपूर्ण रॉयल लंडन कप (50 षटकांची देशांतर्गत स्पर्धा) जून ते सप्टेंबरदरम्यान खेळणार होता. मात्र, भारतीय कसोटी संघात पुनरागमन केल्यामुळे तो या कौंटी संघात सामील होऊ शकला नाही. (Ajinkya Rahane)

या प्रकरणाची माहिती असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वेस्ट इंडिजमधील दोन कसोटी सामन्यांनंतर अजिंक्य थेट इंग्लंडला रवाना होईल (जे 24 जुलै रोजी संपणार आहे) आणि उर्वरित हंगामासाठी लिसेस्टरशायर कौंटी संघात सामील होईल. तो ऑगस्टमध्ये रॉयल लंडन कपमध्ये खेळेल आणि कदाचित सप्टेंबरमध्ये चार कौंटी सामने खेळेल. कारण त्याला मर्यादित षटकांच्या संघात स्थान मिळण्याची अपेक्षा नाही.

दुसर्‍यांदा कौंटी खेळणार

अजिंक्य रहाणे दुसर्‍यांदा कौंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. याआधी 2019 च्या हंगामात तो हॅम्पशायरकडून खेळला होता जेव्हा त्याला 50 षटकांच्या विश्वचषक संघातून वगळण्यात आले होते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताच्या पहिल्या डावात 89 धावा करणार्‍या रहाणेने अलीकडेच 83 कसोटी सामन्यांत 5000 धावा पूर्ण केल्या.

हेही वाचा;

Back to top button