

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अंकित बावणेच्या नाबाद 105 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेटस् संघाचा 4 गडी राखून पराभव करीत विजयी सलामी दिली. (MPL 2023)
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रीतम पाटीलने तडाखेबंद फटकेबाजी करत अवघ्या 32 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. प्रीतमला तुषार श्रीवास्तवने 40 चेंडूंत 32 धावांची संयमी खेळी करून साथ दिली. त्यांना किरण चोरमले (27 धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेटस् संघाने कोल्हापूर टस्कर्स संघापुढे 177 धावांचे आव्हान उभे केले. कोल्हापूर संघाच्या श्रेयस चव्हाण (1-27), तरणजीत ढिलोन (1-28) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत धावसंख्या रोखण्यावर अंकुश ठेवला. (MPL 2023)
या मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना कोल्हापूर संघाचा कर्णधार केदार जाधव हा केवळ 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर अंकित बावणे याने संघाची धुरा सांभाळताना 60 चेंडूंत 11 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 105 धावांची तडाखेबाज फलंदाजी करीत संघाला विजय मिळवून दिला. त्याला तरणजितसिंग धिल्लन (21 धावा) आणि सचिन धस याने (13 धावा) सुरेख साथ दिली. गोलंदाजीमध्ये रत्नागिरी संघाकडून प्रदीप दाढेने 31 धावांमध्ये 3 गडी बाद केले. अंकित बावणे याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चौथ्या दिवशी धनराज शिंदेची उपयुक्त नाबाद 42 धावांची खेळी, तर प्रशांत सोळंकी (3-12), अक्षय काळोखे (2-26) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सोलापूर रॉयल्स संघावर 82 धावांनी विजय मिळवत आपली विजयी मालिका कायम ठेवली. (MPL 2023)
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी यशस्वी ठरविला. सलामीचा फलदांज हर्षद खडीवाले (0) ला विकी ओस्तवालने आपल्या गोलंदाजीवर दुसर्याच चेंडूवर झेलबाद केले. तर, मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्या अर्शिन कुलकर्णी (18 धावा) ला आज मोठी खेळी करता आली नाही. त्याला जलदगती गोलंदाज प्रणव सिंगने पायचित बाद केले. ईगल नाशिक टायटन्स संघाने 160 धावा केल्या.
161 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या सोलापूर रॉयल्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. नाशिकच्या प्रशांत सोळंकी (3-12), अक्षय काळोखे (2-26) या तीन फिरकी गोलंदाजांनी सोलापूरचा डाव 16.3 षटकांत सर्वबाद 79 धावात उद्ध्वस्त केला. यामध्ये लेगस्पिनर प्रशांत सोळंकी (3-12), डावखुरा अक्षय काळोखे (2-26) व अक्षय वाईकर (1-12) यांचा मोलाचा वाटा होता. यात यश नाहर (17 धावा), यासर शेख (11 धावा), ऋषभ राठोड (32 धावा) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
हेही वाचा;