

किणी, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावर कारने दुचाकीस्वारास धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अंबप फाट्याजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. अजित रामगोंडा भंडे (वय ४०,रा. वसगडे, ता.करवीर जि. कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काम करणारे अजित भंडे हे कामानिमित्त अंबप फाट्याजवळील एका कंपनीत आले होते. काम संपवून तर कोल्हापूरच्या दिशेने परतत असताना मुंबईहुन कोल्हापूर मार्गे हनिमूनसाठी गोव्याला जाणाऱ्या निखिल गजानन निमक यांच्या मारुती एस क्रॉस कारने अंबप फाट्याजवळ मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकलस्वार अजित भंडे हे गाडीवरून उडून खाली पडले. याबरोबरच त्यांच्या डोक्याचे हेल्मेटही खाली पडले यात त्यांच्या तोंडाला व डोक्याला मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
धडक जोराची असल्याने दोन्ही गाड्या महामार्गाच्या कडेला सहा पदरीकरणासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावर खाली गेल्या होत्या. अपघातानंर वाहतूकीची मोठी कोंडी झाली. घटनास्थळी महामार्ग पोलिस मदत केंद्र व पेठ वडगांव पोलिसानी येऊन वाहतूक सुरळीत केली.या अपघाताची नोंद वडगांव पोलीस ठाण्यात झाली असून पो.ना.व्ही.एन.तांबे व योगेश राक्षे अधिक तपास करत आहेत. मयत अजित भंडे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. वसगडे येथील सोनारमाळ नावाच्या शेताजवळ राहत होते.