Rohit Sharma vs Ajinkya Rahane : रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर? अजिंक्य रहाणे कर्णधारपदाच्या शर्यतीत

Rohit Sharma vs Ajinkya Rahane : रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर? अजिंक्य रहाणे कर्णधारपदाच्या शर्यतीत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma vs Ajinkya Rahane : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्याची दीर्घ विश्रांती मिळाली आहे. टीम इंडियाला आता पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजला जायचे आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होत आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 सामनेही खेळले जाणार आहेत. दरम्यान, दौऱ्यातील काही सामन्यांमधून रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते, असे वृत्त समोर येत आहे. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कसोटी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.

एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, हिटमॅन रोहितला कसोटी मालिकेत किंवा मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहित थकला दिसला. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातील काही सामन्यांमध्ये त्याला विश्रांती देण्यात यावी, अशी निवडकर्त्यांची इच्छा आहे. अशातच त्याला कसोटी किंवा वनडे-टी20 सामन्यांच्या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. रोहितशी चर्चा केल्यानंतर निवडकर्ते याबाबत अंतिम निर्णय घेतील असेही सांगण्यात आले आहे. (Rohit Sharma vs Ajinkya Rahane)

आयपीएल 2023 मध्ये, रोहितने 16 सामन्यात 21 च्या सरासरीने केवळ 332 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके फटकावली. त्यानंतरच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्येही त्याने निराशाजन कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात तो 15 आणि दुस-या डावात 43 धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत रोहित आणि विराट दोघांनाही कसोटी मालिकेतून विश्रांती दिल्यास चेतेश्वर पुजाराला कसोटी संघात संधी मिळू शकते. पण तोही सातत्याने खराब कामगिरी करत आहे. त्यामुळे पुजारालावरच टांगती तलवार असून त्याचे संघातील स्थान अनिश्चित असल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, विंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी देण्यात येईल. 18 महिन्यांनंतर पुनरागमन करताना त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 89 आणि 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्यापूर्वी 2021 मध्ये त्याने कर्णधार म्हणून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत 2-1 ने विजय मिळवून दिला होता. (Rohit Sharma vs Ajinkya Rahane)

एकदिवसीय विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे बड्या खेळाडूंच्या वर्कलोडवरही लक्ष ठेवले जात आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये सर्व मोठ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला या स्पर्धेतून धार मिळेल.

ओव्हलवरील डब्ल्यूटीसीच्या फायनलमधील भारताच्या पराभवामुळे कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविरुद्ध अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खेळपट्टीच्या परिस्थितीची चुकीची गणना करणे तसेच फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे, यावरून दोघांवर टीकेची झोड उठली. त्यामुळे भारतीय संघात खळबळ उडाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव चाहत्यांसह बोर्डालाही पचवता आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news