Ishan Kishan : इशानचा दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार | पुढारी

Ishan Kishan : इशानचा दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याच्या जागी के. एस. भरतची निवड करण्यात आली होती, पण त्याच्या खराब कामगिरीमुळे निराशा केली. अशा परिस्थितीत के. एस. भरतवरही प्रश्न उपस्थित केले जात असून पुढील महिन्यात भरतला वेस्ट इंडिज दौर्‍यातून वगळले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. भरतच्या जागी इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे, परंतु यादरम्यान इशानने दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Ishan Kishan)

इशानला त्याच्या कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित करण्याची आणि कसोटी संघात पंतच्या जागी उदयास येण्याची चांगली संधी होती. मात्र, इशानने देशांतर्गत स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत निवडकर्ते दुसरा पर्याय पाहू शकतात. (Ishan Kishan)

ईस्ट झोन निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, त्यांनी इशान किशनची निवड करू शकतात का, असे त्यांनी झोन कमिटीला विचारले होते; परंतु इशान किशनने दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिल्याचे समजले. त्याच्या या निर्णयानंतर सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनची पूर्व विभागाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये इशान हा भारताचा नियमित खेळाडू होता, त्यामुळे त्याला कर्णधारपद मिळू शकले असते, असे निवडकर्त्याने सांगितले. यादरम्यान आम्ही त्याच्याशी फोनवर बोललो, पण त्याने सांगितले की त्याला दुलीप ट्रॉफी खेळायची नाही.

जर तो दुलीप करंडक खेळला असता तर कदाचित त्याचा आत्मविश्वास वाढला असता आणि अशा स्थितीत तो कसोटी संघातही आपले स्थान पक्के करू शकला असता, पण आता त्याने खेळण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय कसोटी संघात त्याचा समावेश होणार की निवड समिती इतर पर्याय पाहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा;

Back to top button