

पुढारी ऑनलाईन डेस्क : ENG vs AUS Ashes 2023 : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेची उत्कंठा सर्वांनाच लागून राहिली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी शुक्रवारपासून (दि. 16) एजबॅस्टन येथे सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वीच यजमान इंग्लंडने त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
डब्ल्यूटीसी 2023 चे विजेतेपद पटकावणा-या ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी इंग्लिश संघात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नुकतीच निवृत्ती मागे घेणा-या मोईन अलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन हे वेगवान गोलंदाज दुखापतींमुळे आयर्लंड कसोटीला मुकले होते, त्यांचेही पुनरगान झाले आहे. मार्क वूडला विश्रांती देण्यात आली असून स्टुअर्ट ब्रॉडला पुन्हा एकदा नव्या चेंडूने डेव्हिड वॉर्नरला आव्हान देण्याची संधी देण्यात आली आहे. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने 2019 च्या ऍशेसमध्ये दहा डावांपैकी सात वेळा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिडची शिकार केली होती. आगामी मालिकेतही त्याची पुनरावृत्ती होईल का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (ENG vs AUS Ashes 2023)
2021-22 मध्ये झालेल्या ॲशेस मालिकेतील ब्रिस्बेन कसोटीत इंग्लंडने ब्रॉडला विश्रांती दिली होती. यामुळे वॉर्नरने पहिल्या डावात 94 धावा केल्या, परिणामी इंग्लंडचा नऊ विकेट्सनी पराभव झाला. दरम्यान, यंदाच्या मालिकेपूर्वी ब्रॉडचे पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित नव्हते, परंतु तो पुन्हा एकदा वॉर्नरला सळो की पळो करण्यासाठी सज्ज झाला आहे.
ब्रॉड म्हणाला, 'डेव्हिड वॉर्नर विरुद्धची माझी लढाई सुरू ठेवणे खूप चांगले होईल. मी त्याला धावा करण्याची संघाचे देणार नाही. त्याची विकेट मिळवण्याचा आनंद वेगळाच आहे. त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी माझी रणनिती तयार आहे. मैदानात उतरल्यावर त्याचा प्रत्यय येईल. मला वाटते की आम्ही दोघेही खूप स्पर्धात्मक आहोत आणि त्यामुळेच एकमेकांसमोर सर्वोत्कृष्ट खेळ समोर येतो.'
बेन डकेट, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन