Indonesia Open : लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत दुसर्‍या फेरीत | पुढारी

Indonesia Open : लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत दुसर्‍या फेरीत

जकार्ता; वृत्तसंस्था : राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेन व राष्ट्रीय सहकारी किदाम्बी श्रीकांत यांनी इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 इव्हेंटमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली. ही स्पर्धा जकार्तामध्ये सुरू झाली आहे. (Indonesia Open)

जागतिक क्रमवारीत 20 वा मानांकित व वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्य जेता लक्ष्य सेनने मलेशियाच्या झी जिया ली याच्यावर मात करण्यासाठी केवळ 32 मिनिटे घेतली. त्याने जागतिक क्रमवारीतील 11 व्या मानांकित प्रतिस्पर्ध्याला 21-17, 21-13 अशा सहज फरकाने मात दिली. (Indonesia Open)

अन्य लढतीत श्रीकांतने देखील सहज विजय संपादन केला. त्याने चीनच्या ग्वांग झू लू याला 21-13, 21-19 अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह 22 व्या मानांकित श्रीकांतने लू विरुद्ध आपली कामगिरी 5-0 अशी आणखी भक्कम केली. अर्थात, पुढील फेरीत लक्ष्य व श्रीकांत हेच परस्परांना भिडणार असल्याने यातील एकाचे स्पर्धेतील आव्हान तेथेच संपुष्टात येणार आहे. (Indonesia Open)

या स्पर्धेत सहभागी आणखी एक भारतीय खेळाडू प्रियांशू राजवतला पुढे चाल मिळाली. थायलंडच्या कुनलवत व्हिटीर्डसन यावेळी खेळू शकला नाही. राजवतला देखील हॅन्स क्रिस्तियन व द्वितीय मानांकित अँथोनी सिनिसुका गिंतिंग यांच्यातील विजेत्याला लढावे लागणार असल्याने त्याच्यासाठीही कठीण ड्रॉ असणार आहे.

अन्य भारतीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये एच.एस. प्रणॉय हाँगकाँगच्या अँगस लाँगविरुद्ध लढणे अपेक्षित आहे. युवा महिला बॅडमिंटनपटू आकर्षी कश्यपला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत आकर्षीला कोरियाच्या द्वितीय मानांकित अ‍ॅन से यंगकडून 10-21, 4-21 अशा एकतर्फी पराभवासह स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.

हेही वाचा;

Back to top button