नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघावर केलेल्या गंभीर आरोपानंतर ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. ही निवडणूक 4 जुलै रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बृजभूषण शरण सिंह यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी औपचारिकपणे संपणार आहे. गेली 12 वर्षे ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रत्येकी चार वर्षांच्या तीन टर्म पूर्ण केल्या आहेत.
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 45 दिवसांत निवडणुका घेण्यास सांगितले होते, निवडणूक न झाल्यास असोसिएशनला निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला होता. अलीकडेच क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांची भेट घेतल्यानंतर 30 जूनपर्यंत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 4 जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. आयओएने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणुकीसाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांचे तीन कार्यकाळ पूर्ण झाले आहेत.
देशातील प्रमुख महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार तथा भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरोधात जवळपास महिनाभर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर निदर्शने केली आहेत. आंदोलक कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पिक आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकलेल्या कुस्तीपटूंचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या निमंत्रणावरून आंदोलक कुस्तीपटूंनी गेल्या आठवड्यात क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी निवडणुकीशी संबंधित मागणीही मांडली होती. मावळते अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्याला फेडरेशनमध्ये जागा देण्यात येऊ नये, अशी मागणी कुस्तीपटूंनी केली होती. या भेटीत बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांचा सहभाग होता.