Retail inflation : किरकोळ महागाई 25 महिन्यांच्या नीचांकावर, खाद्यपदार्थांच्या किमतीत घसरण | पुढारी

Retail inflation : किरकोळ महागाई 25 महिन्यांच्या नीचांकावर, खाद्यपदार्थांच्या किमतीत घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने सोमवारी मे महिन्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकाची (सीपीआय) आकडेवारी जाहीर केली. यानुसार, किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 25 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे महागाई आघाडीवर काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात महागाईचा दर 4.25 टक्के राहिला. भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाने मे 2023 मधील किरकोळ महागाई मे 2023 मध्ये घट नोंदवून नवीनतम आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अन्न, इंधन आणि अन्नधान्याच्या महागाई दरात घट नोंदवली गेली आहे. या व्यतिरिक्त, तृणधान्ये आणि भाज्यांच्या किमतीत घसरण झाल्याने मे महिन्यात महागाईची पातळी कमी ठेवण्यास मदत झाली. त्यामुळे किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 4.25 टक्के नोंदवला गेला, जो 25 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. एप्रिलमध्ये हा महागाई दर 4.60 टक्के होता.

ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CPFI) एप्रिलमधील 3.84 टक्क्यांवरून मे महिन्यात 2.91 टक्क्यांवर घसरला. ग्रामीण महागाई दर 4.17 टक्के तर शहरी महागाई 4.27 टक्के आहे. मे महिन्यात भाजीपाल्याच्या महागाई दरात 8.1 टक्क्यांची घट झाली. अन्न-पेय आणि इंधन विभागातील महागाई पातळी अनुक्रमे 3.29 टक्के आणि 4.64 टक्के राहिली. त्याच वेळी, तृणधान्यांचा महागाई दर 13.67 टक्क्यांवरून 12.65 टक्क्यांवर आला.

Back to top button