पुढारी ऑनलाईन डेस्क : Flop Man Rohit : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. ऑस्ट्रेलियाने 209 धावांच्या मोठ्या फरकाने रोहित सेनेला मात देत डब्ल्यूटीसीची गदा उंचावली. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची एकूण कामगिरी खूपच खराब झाली, ज्याचा फटका संघाला बसला.
या सामन्यातच नाही तर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाची कामगिरी खराब राहिल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाने 9 मोठ्या संधी गमावल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नव्या उंचीला स्पर्श करेल अशी अपेक्षा होती, पण त्यात यश आलेले नाही. उलट कामगिरी आणखीनच खराब झाल्याचे दिसत आहे. आशिया कप 2022 आणि टी-20 वर्ल्ड कप 2022 सारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाला बाद फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला आहे. (Flop Man Rohit)
खरे तर भारतीय संघाला आशिया चषक 2022 आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सहाजिकच चाहत्यांचा अपेक्षा भंग झाला. आशिया चषक 2022 च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकून दमदार सुरुवात केली, पण सुपर फोर फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव करत विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर काढले. (Flop Man Rohit)
यानंतर टीम इंडिया 2022 च्या टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावेल अशी अपेक्षा होती. पण तसे होऊ शकले नाही. यावेळीही भारतीय चाहत्यांची निराशाच झाली. टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपची सुरुवात नक्कीच विजयाने केली. त्यानंतर सुपर 12 मध्ये बांगलादेश आणि झिम्बाब्वेला पराभूत करून टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, पण उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला, त्यामुळे टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड जिंकण्याचे स्वप्न भंगले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा पराभव होण्याची ही तिसरी घटना होती.