पुढारी ऑनलाईन डेस्क : Defeat of Team India : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 चा अंतिम सामना रविवारी (11 जून) संपला. दोन वर्षे चाललेल्या डब्ल्यूटीसी (WTC)च्या या दुसऱ्या सत्रातील अंतिम सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 209 धावांनी विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
दरम्यान, या पराभवामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपदाचे स्वप्न भंगले आहे. टीम इंडियाने 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून, संघाने सातत्याने आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीपर्यंत धडक मारली. पण त्याचे विजेतेपदामध्ये रुपांतर करण्यात संघाचे खेळाडू अपयशी ठरले आहेत. ज्यामुळे गेल्या 10 पैकी 9 आयसीसी स्पर्धांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Defeat of Team India)
भारतीय संघ कधी उपांत्य फेरीत हरतो, तर कधी फायनलमध्ये पोहोचल्यानंतर निराश करतो. यंदा संघाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली. अशा स्थितीत यावेळी आयसीसीच्या जेतेपदावर नाव कोरले जाईल असे वाटत होते, मात्र पुन्हा एकदा तेच घडले ज्याची भीती होती. टीम इंडियाने सामन्यासह विजेतेपदही गमावले.
आयसीसी इव्हेंट्सच्या बाद फेरीत भारतीय टॉप-4 फलंदाजांनी नेहमीच निराश केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलपासून तर त्यांच्या कामगिरीला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. अव्वल-4 फलंदाजांनी सरासरी आणि स्ट्राइक रेट या दोन्ही बाबतीत सातत्याने निराशा केल्याचे आकडेवारी साक्ष देतता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलपासून ते आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या अंतिम सामन्यापर्यंत, भारताने एकूण पाच आयसीसी ट्रॉफी नॉकआउट सामने खेळले. यादरम्यान टॉप-4 मध्ये फक्त एका फलंदाजाला पन्नास धावा करता आल्या आहेत आणि तो म्हणजे विराट कोहली.
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलपासून भारताच्या एकूण 9 फलंदाजांनी आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये टॉप-4 स्थानांवर फलंदाजी केली आहे. यामध्ये रोहित आणि विराट हे दोनच फलंदाज आहेत जे पाचही सामन्यांचा भाग राहिले आहेत. तर शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि केएल राहुल यांनी असे प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. तर ऋषभ पंत, युवराज सिंग, शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी एकच सामना खेळला आहे. विराट कोहलीने पाच सामन्यांमध्ये 25.14 च्या सरासरीने फक्त 176 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 54.15 आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 50 आहे.
रोहित शर्माने पाच सामन्यांमध्ये 21.42 च्या सरासरीने केवळ 150 धावा केल्या. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 43 आहे, जी त्याने डब्ल्यूटी 2021-23 च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात केली आहे. यानंतर शुबमन गिलचा नंबर लागतो. पण नुकत्याच डब्ल्यूटीसीच्या दोन्ही अंतिम सामन्यांत तो अपयशी ठरला आहे. गिलने दोन सामन्यांच्या चार डावात 16.75 च्या सरासरीने फक्त 67 धावा केल्या. 28 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
चेतेश्वर पुजाराने डब्ल्यूटीसीच्या दोन फायनलमध्ये 16 च्या सरासरीने 27 च्या सर्वोच्च स्कोअरसह चार डावात 64 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने 2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळला होता आणि त्या सामन्यात तो 32 धावांवर बाद झाला होता. सरासरीचा विचार करता पंत 32 च्या सरासरीसह आघाडीवर आहे. युवराज सिंग 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला आणि तो फक्त 22 धावा करून बाद झाला होता. शिखर धवनही हाच सामना खेळला आणि 17 धावा करून तंबूत परतला. सूर्यकुमार यादवने 2022 च्या टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना खेळला आणि इंग्लंडविरुद्ध 14 धावा करून बाद झाला. तर केएल राहुल 2019 विश्वचषक आणि 2022 टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीचे सामने खेळला. ते दोन्ही सामने एकत्र करून राहुलने तीनच्या सरासरीने केवळ सहा धावा केल्या आहेत.