रवींद्र जडेजाने केला महारेकॉर्ड! ‘या’ खास यादीत ठरला भारताचा नंबर 1 गोलंदाज | पुढारी

रवींद्र जडेजाने केला महारेकॉर्ड! ‘या’ खास यादीत ठरला भारताचा नंबर 1 गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC फायनल) तिसऱ्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने एक नवा टप्पा गाठला. भारताच्या या फिरकी अष्टपैलूने कसोटी बळींच्या बाबतीत माजी फिरकी अष्टपैलू बिशनसिंग बेदी यांना मागे टाकले आहे. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फिरकीपटू बनला आहे.

WTC फायनलमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चांगलाच फॉर्मात आहे. गोलंदाजीदरम्यान त्याने पहिल्या डावात विकेट घेतली आणि त्यानंतर फलंदाजीतही अजिंक्य रहाणेसोबत 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत वैयक्तीक 48 धावांची शानदार खेळी केली.

WTC Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, मार्नस लॅबुशेन बाद

जडेजाने 2 बळी घेत रचला नवा विक्रम (Ravindra Jadeja)

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही जडेजाने अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या डावात शतके झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडची विकेट घेऊन त्याने टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन केले. या दोन विकेट्ससह जडेजाच्या कसोटी क्रिकेटमधील विकेट्सची संख्या 267 वर पोहचली. भारताचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांनी आपल्या कारकिर्दीत 67 कसोटी सामन्यांच्या 118 डावात 266 विकेट घेतल्या. आता त्यांना मागे टाकून जडेजा हा भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. तर भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

34 वर्षीय जडेजाने (Ravindra Jadeja) आतापर्यंत कसोटी सामन्यांच्या 124 डावांमध्ये 24.25 च्या सरासरीने 267 विकेट्स घेतल्या आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून तो जगातील चौथा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. या यादीत अव्वल स्थानी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रंगना हेराथ (433), दुस-या स्थानी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरी (362) आणि तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेरेक अंडरवुड (297) आहे.

Back to top button