Ajinkya Rahane : मुंबईकरांच्या खडूस फलंदाजीने अंधुकशी आशा | पुढारी

Ajinkya Rahane : मुंबईकरांच्या खडूस फलंदाजीने अंधुकशी आशा

‘रहाणे पुन्हा तारणहार ठरेल’ या कालच्या शीर्षकाचे उत्तर रहाणेने दिले. खरे तर 5 बाद 151 या धावसंख्येवर अशी अपेक्षा करणे हा आशावाद होता, पण अजिंक्य रहाणेच्या दुसर्‍या दिवसाच्या 29 धावांत दिसली होती ती म्हणजे त्याची खेळपट्टीवर जास्तीत जास्त काळ उभे राहायची जिद्द. दुसर्‍या बाजूने पत्याचे जोडीदार संपत होते. त्यात बोलँड आपल्या लेंग्थच्या अचूकतेवर कर्दनकाळ ठरत होता. तिसर्‍या दिवसाच्या दुसर्‍याच चेंडूवर गिल आणि पुजाराच्या पावलावर पाऊल ठेवत भरत बाद झाल्यावर सर्व आशा अंधुक झाल्या होत्या. अजिंक्य रहाणेच्या जोडीला दुसरा मुंबईकर शार्दूल ठाकूर आला आणि भारताच्या पडझडीला लगाम बसला. मुंबईचा क्रिकेटपटू हा खडूस म्हणून ओळखला जातो तो त्याच्या सहजासहजी हार न मानण्याच्या वृत्तीने. या दोघांनी धावफलक हलता ठेवला आणि भारताला लाजिरवाण्या परिस्थितीतून हळूहळू बाहेर काढले. आजकाल फॉलोऑन द्यायच्या फंदात पडत कुणी नाही तेव्हा तो मिळणारच नव्हता, पण फॉलोऑनची अधिकृत शक्यता त्यांनी घालवून टाकली. कसोटी क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे सामने सामन्याच्या दरम्यान खेळायचे असतात. त्यातला हा फॉलोऑनचा सामना या दोघांनी सर केला. (Ajinkya Rahane)

अजिक्य रहाणे तब्बल 18 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. एकेकाळचा भारताचा उपकर्णधार, संधी मिळेल तेव्हा मिळेल त्या संघाने यश संपादन करणारा कर्णधार, परदेशी मैदानावरचा हुकमी फलंदाज या कसोटीच्या रूपाने भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायला धडपडत होता. रहाणे हा मुळात संघ भावना जपणारा खेळाडू असल्याने त्याने त्याच्यावर झालेला वगळण्याचा आघात चेहर्‍यावर अथवा वक्तव्यातून कधीही न दाखवला नाही. ज्या संघात तो होता तिथे त्याने आपले शंभर टक्के योगदान दिले मग तो मुंबईचा संघ असो वा चेन्नई सुपर किंग्जचा. ही संधीही त्याला मिळाली ती श्रेयस अय्यरच्या दुखापतीने. रहाणेने आपल्या बॅटमार्फत बोलत प्रथम त्याच्यावर टी-20 चा खेळाडू नसल्याचा शिक्का आयपीएलमध्ये पुसून टाकला आणि या पुनरागमनाच्या सामन्यात त्याच्यावर प्रचंड दडपण असताना संघ नाजूक अवस्थेत असताना त्याने शार्दूल ठाकूरच्या मदतीने आपला शिक्का पुन्हा उठवत आपले स्थान दाखवून दिले. (Ajinkya Rahane)

भारतीय संघाचे बाकीचे फलंदाज आणि रहाणे यांच्यात तसेच पूर्वीचा रहाणे आणि या सामन्यातील रहाणे यांच्यात ठळकपणे दिसणारा फरक म्हणजे तो चेंडूकडे गेला नाही तर बॅकफूटचा उत्तम वापर करत त्याने चेंडू बॅटवर यायची वाट बघून त्याचे फटके खेळला. त्याच्या बहुतांशी धावा या त्याच्या पसंतीच्या ऑफ साईडच्या पट्ट्यात होत्या, पण पूर्वी तो फ्रंट फूटवर फटक्यासाठी कमिट व्हायचा आणि त्यामुळे चेंडूच्या लेंग्थमुळे त्याच्या बॅटची कड लागून झेल स्लीप ते पॉईंटच्या पट्ट्यात उडायचे. या डावात त्याच्यात हा मोठा बदल दिसला. शार्दूल ठाकूरने या ओव्हलवर 2021 ला दोन अर्धशतके काढली आहेत. त्यावेळच्या इंग्लंडच्या मार्‍यापेक्षा आताचा ऑस्ट्रेलियन मारा तिखट आहे, पण शार्दूलने खेळपट्टीवर उभे राहण्याची जिद्द दाखवली. वेळप्रसंगी अंगावर मारा घेत त्याने अर्धशतक झळकावून रहाणेला उत्तम साथ दिली.

रहाणे आणि ठाकूरला जीवदाने मिळाली, नो बॉलवर ते नाबाद ठरले, पण ते उभे राहिले हे महत्त्वाचे. भारताच्या दुसर्‍या डावात पहिल्या चार फलंदाजांकडून ही अपेक्षा आहे. रहाणे तारणहार ठरला का? ऑस्ट्रेलियाची आजची मजबूत 296 धावांची आघाडी बघता आणि अजून 6 फलंदाज बाद व्हायचे असताना ते नक्कीच विजयाच्या मार्गावर आहेत, पण रहाणेने शार्दूल ठाकूरच्या मदतीने हा सामना चौथ्या किंवा कदाचित पाचव्या दिवसापर्यंत ढकलला आहे. याचमुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात आपल्याला आक्रमक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची आठवण झाली आणि ऑस्ट्रेलियाला आपण मुक्तपणे फलंदाजी करून दिली नाही. खेळपट्टीच्या अवस्थेवरून अश्विनची उणीव पुन्हा भासत आहे. भारतापुढे साडेतीनशेच्या पुढे टार्गेट आले तर या ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाविरुद्ध ते गाठणे कठीण आहे, पण दुसर्‍या डावात टिच्चून फलंदाजी करून सामना अनिर्णीत राहून संयुक्त विजेते व्हायची अंधुकशी आशा रहाणे-ठाकूर जोडीने आज निर्माण केली.

– निमिष पाटगावकर

हेही वाचा;

 

Back to top button