

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकर्यांच्या विकासात भूविकास बँकेचे मोलाचे योगदान राहिले असून ही बँक अवसायनात निघून बंद पडल्याचे निश्चितच दु:ख आहे. मात्र, शेतकर्यांचा सात बारा उतारा कोरा करणे आणि बँकेच्या कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद म्हणजे एका डोळ्यात आसू तर, दुसर्या डोळ्यात हसू असल्याची भावना राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
येथील अल्पबचत-भवनमध्ये भूविकास बँक कर्मचारी आणि शेतकर्यांच्यावतीने आयोजित 'कृतज्ञता मेळाव्या'त को-ऑप बँक एम्पॉईज युनियचे अध्यक्ष, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजीत अडसूळ, सुनील साळवी, नरेंद्र सावंत, नितीन खोडदे, एम. पी. पाटील, अरविंद थलवर, कैलास गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून मी 2022-23 च्या अर्थसंकल्पात भू-विकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकर्यांकडे असलेले 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. तसेच बँक कर्मचार्यांची 275 कोटींची थकबाकी एकरकमी देण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचे नमूद करुन पवार म्हणाले, राज्यातील काही जिल्हा बँका आर्थिक अडचणीत असून बँका नीट चालविणे हे संचालक मंडळाच्या हातात असते. बँकेचे विश्वस्त म्हणून बसल्यानंतर संचालकांनी वेडेवाकडे निर्णय न घेता आणि मूठभर लोकांचा विचार न करता समाजाचे हित लक्षात ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या कामाचे कौतुक माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. राज्याचे तीन वेळा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम केले असून त्यांच्यामध्ये राज्य चालविण्याची कुवत असल्याचे नमूद करीत कधी ना कधी ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना व्यक्त केली. याचा अर्थ मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र हौसिंग कॉर्पोरेशनच्या आर्थिक अडचणींबाबत आनंदराव अडसूळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर आपण प्रश्न मांडावा, विरोधी पक्षनेता म्हणून माझी सहकार्याची भुमिका राहील असे नमूद करुन पवार म्हणाले, फार कमी लोक माणसांची आठवण ठेवतात. कारण आजकाल उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. मात्र, मी सरकारमध्ये असताना केलेल्या कामाची आठवण ठेवून मनाचा मोठेपणा व दिलदारपणा दाखवित भू-विकास बँक कर्मचार्यांनी माझ्या केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद देतो, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा;