Rain Update : पाऊस लाबंला; खाडीतील पारंपारिक मासेमारी ठप्प! | पुढारी

Rain Update : पाऊस लाबंला; खाडीतील पारंपारिक मासेमारी ठप्प!

देवगड; सूरज कोयंडे : मासेमारी बंदी सुरू झाल्याने समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद झाली असून खाडीतील पारंपारिक मच्छीमारीला सुरूवात होणार होती. मात्र पाऊस लांबल्यामुळे त्या मच्छीमारीलाही अद्याप सुरूवात न झाल्याने मासळीची टंचाई जाणवणार आहे. (Rain Update)

खोल समुद्रातील मासेमारीच्या बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै आहे. त्यामुळे सध्या समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. देवगड बंदरातील बहुतांशी नौका किनार्‍यावर विसावल्या आहेत. या नौकांवर काम करणारे परप्रांतीय व स्थानिक कामगारही गावी गेले आहेत. त्यामुळे बंदरावरील वर्दळ कमी झाली आहे. बहुतांशी नौका किनार्‍यावरआल्या असून काही नौकांची शाकारणी झाली आहे तर काही नौकांची सुरू आहे. (Rain Update)

मच्छीमारी बंदी कालावधीत प्रामुख्याने खाडीतील मासेमारी केली जाते. छोट्या होड्यांच्या व पारंपारिक जाळ्यांच्या सहाय्याने ही मच्छीमारी केली जाते. देवगड तालुक्यातील वाडातर, तारामुंबरी, मोंड, तांबळडेग, कट्टा, मळई खाडीपात्रात ही मच्छीमारी पावसाळी हंगामात होते. मात्र यावर्षी मान्सूनचे आगमन कमालीचे लांबल्याने खाडीतील मच्छीमारीला अद्याप सुरूवात झालेली नाही. त्यामुळे खवय्यांना मासळीची टंचाई जाणवणार आहे. (Weather Forecast)

खोल समुद्रातील मच्छीमारी बंद झाल्यानंतर सुरमई, पापलेट, सरंगा आदी दर्जेदार मासळी मिळणे बंद झाल्यामुळे खाडीतील सुळा, गुंजली, तांबोसे या माशांना पावसाळ्यात खवय्ये तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते. देवगडमधील स्थानिक हॉटेलच्या मेन्यू कार्ड वरही सुरमई, पापलेट, सरंगा या माशांची जागा खाडीच्या सुळा, तांबोसा हे मासे घेतात. मात्र पाऊस लांबल्याने या मच्छीमारीला अद्याप सुरूवात झालेली नाही. यामुळे सद्यस्थितीत हे मासे उपलब्ध नाहीत. परिणामत: एकीकडे खोल समुद्रातील मच्छीमारी सुरू असताना सरंगा, पापलेट, सुरमई असे चविष्ट मिळणारे मासे आता बंद झालेले असतानाच खाडीतील पारंपारिक मच्छीमारीला अद्याप सुरूवात न झाल्याने खवय्यांना मासळी मिळणे कठीण झाले आहे.

खोल समुद्रातील मच्छीमारी बंद झाल्याने ऑक्टोबरपासून गजबजलेले लिलाव सेंटरही आता सुनेसुने आहे. बाहेरून येणारा व्यापारीवर्गही आता बंद झाला आहे. तसेच बाहेरून मासळी खरेदी करण्यासाठी येणार्‍या महिला व्यावसायिकही येणे बंद झाले आहे.

जिल्ह्यात देवगड तालुक्यात मळई, मोंड, तारामुंबरी, तांबळडेग मोर्वे, विजयदुर्ग, मणचे, मालवण तालुक्यात आचरा, कालावल, कोळंब, तारकर्ली देवबाग, तळाशील रेवंडी, वेंगुर्ला तालुक्यात मोचेमाड, निवती, केळूस तसेच आरोंदा आदी खाड्यांमध्ये पारंपारिक मच्छीमारी व्यवसाय चालतो. या खाड्यांमध्ये कांडाळी, पागाद्वारे मच्छीमारी केली जाते. प्रामुख्याने सुळा, शेतूक, गुंजली, लेप, शेंगटी, कापटे, डायन, तांबवसे, बानवशी, पालू, कोेकरी अशाप्रकारचे मासे मिळतात. मात्र अद्याप पावसाळा सुरू न झाल्याने खाडीतील पारंपारिक व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सध्या खाडीमध्ये चांगल्या दर्जाची मासळी मिळत नसल्याने पारंपारिक मच्छीमारी व्यवसायालाही अजून गती आली नसून पारंपारिक मच्छीमार पावसाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा

Back to top button