Wrestlers Protest : खा.बृजभूषण विरोधात भक्कम आरोपपत्र दाखल करू : केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचे आश्वासन

Wrestlers Protest : खा.बृजभूषण विरोधात भक्कम आरोपपत्र दाखल करू : केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचे आश्वासन
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख खा.बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसोबत सरकारने चर्चा सुरू केली आहे. ( Wrestlers Protest)  मंगळवारी उशिरा रात्री केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसाठी चर्चेची द्वारे उघडल्यानंतर आज (दि. ७) सकाळी आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानी जावून चर्चा केली. तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीदरम्यान आंदोलकांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक आश्वासन दिले आहे; पंरतु, बृजभूषण यांच्या अटकेसंदर्भात सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचे कळते.  दरम्‍यान, आम्ही १५ जूनपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलन अजून संपलेले नाही, असे माध्‍यमांशी बोलताना कुस्‍तीपटू बजरग पुनिया याने स्‍पष्‍ट केले आहे.

सरकारकडून चर्चेसाठी बोलावण्यात आल्यानंतर ऑलम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी केंद्रीय क्रिडा मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी भारतीय डब्ल्यूएफआय प्रमुख बृजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीवर कुस्तीपटू ठाम राहील्याची माहिती समोर आली आहे.यासोबतच डब्ल्यूएफआय प्रमुखांची निष्पक्षपणे निवडणूक घेण्याची मागणी देखील कुस्तीपटूंनी केली होती.

कुस्तीपटूंच्या मागण्यावर सकारात्मकता दाखवत बृजभूषण यांच्या विरोधात भक्कम आरोपत्र पोलिसांकडून दाखल केले जाईल,असे आश्वासन क्रिडामंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आले आहे.लिखित स्वरुपात ठाकूर यांनी आंदोलकांना प्रस्ताव दिला आहे.या प्रस्तावावर इतर कुस्तीपटू तसेच खाप सोबत चर्चा करीत निर्णय घेवू अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. 'डब्ल्यूएफआय'ची स्वतंत्ररित्या निवडणूक घेतली जाईल, बृजभूषण तसेच त्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला डब्ल्यूएफआयमध्ये स्थान दिले जाणार नाही तसेच २८ मे रोजी कुस्तीपटूंवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन ठाकूर यांनी दिल्याचे समजे.

डब्ल्यूएफआयमध्ये महिला प्रमुखाची नियुक्ती करण्यात यावी तसेच आंदोलना दरम्यान कुस्तपटूंवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली होती. महिला कुस्तीपटूला संघाचे अध्यक्ष बनवण्याच्या गरजेवर भर देत आंदोलकांनी डब्ल्यूएफआय अंतर्गत पारदर्शक आणि नि:पक्षपाती निवडणुका घेण्याचे आवाहन ठाकूर यांच्या समक्ष केले होते.बृजभूषण शरण सिंह अथवा त्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला डब्ल्यूएफआयमध्ये सामील करू नये यावर कुस्तीपटूंनी भर दिला होता.दरम्यान या भेटीनंतर डब्ल्यूएफआयच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे का? आणि महासंघाच्या घटनेत बदल होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा १२ वाजून ४७ मिनिटांनी केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करीत आंदोलन कुस्तीपटूंना औपचारिक चर्चेसाठी आमंत्रित केले.सरकार कुस्तीपटूंसोबत त्यांच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी तयार आहे.पुन्हा एकदा चर्चेसाठी कुस्तीपटूंना आमंत्रित केले आहे, अशी माहिती ठाकूर यांनी ट्विट करीत दिली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news