हिंगोली : बासंबा येथे मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, दोघेजण ताब्यात | पुढारी

हिंगोली : बासंबा येथे मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, दोघेजण ताब्यात

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बासंबा येथे ऑटोवर बुक्की मारण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.६) रात्री आठ वाजता घडली आहे. शेख सादिक शेख रशीद (३०, रा. बासंबा) असे मयत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बासंबा येथील शेख सादिक हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बासंबा येथील झोपडपट्टी भागात आल्यानंतर तेथे असलेल्या चार जणांसोबत त्याचा ऑटोवर बुक्की मारण्याच्या कारणावरून वाद झाला. शाब्दिक चकमकीनंतर हाणामारीला सुरुवात झाली. हाणामारी मध्ये शेख सादिक याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच कोसळला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार उमर शेख, संतोष मोरे, पंजाब हराळ, खंडेराव नरोटे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचताच शेख सादिक याला तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बासंबा येथे रवाना केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणांमध्ये दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा;

Back to top button