WTC Virat Kohli Records : विराट कोहलीच्या निशाण्यावर तेंडुलकर, पॉन्टिंगचे ‘हे’ विक्रम! | पुढारी

WTC Virat Kohli Records : विराट कोहलीच्या निशाण्यावर तेंडुलकर, पॉन्टिंगचे ‘हे’ विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Virat Kohli Records : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC Final) ची अंतिम फेरी बुधवारपासून (7 मे) सुरू होत आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (Ind vs Aus) संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 2022 मध्ये त्याच्या फॉर्म पुन्हा मिळवला असून त्याने त्यात सातत्य ठेवले आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) देखील अप्रतिम फलंदाजी करत 639 धावा वसूल केल्या होत्या. त्याची धमाकेदार फलंदाजी चाहत्यांना डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्येही पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. जर कोहली मोठी इनिंग खेळण्यात यशस्वी ठरला तर तो अनेक विक्रम त्याच्या नावावर करेल.

कोहली आयसीसी टूर्नामेंटमधील (Virat Kohli ICC Tournaments Matches) नॉकआऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनू शकतो. यासाठी त्याला 111 धावांची गरज आहे. त्याने आतापर्यंत 15 नॉकआउट इनिंगमध्ये 620 धावा केल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (ricky ponting) आघाडीवर आहे. त्याने 18 डावांमध्ये 731 धावा जमा केल्या आहेत. तर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 14 डावात 658 धावा केल्या आहेत. सचिनला मागे टाकण्यासाठी कोहलीला 38 धावांची गरज आहे. (WTC Virat Kohli Records)

कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध (kohli vs australia) दोन मोठे आकडे गाठू शकतो. 21 धावा करताच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत दोन हजार धावांचा आकडा गाठणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरेल. त्याने 24 कसोटीत 1979 धावा केल्या आहेत. तर 55 धावा केल्यास तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा दुसरा खेळाडू बनेल. त्याच्या नावावर सध्या 92 सामन्यात 4945 धावा आहेत. सचिन तेंडुलकर कांगारूंविरुद्ध सर्वाधिक धावा फटकावण्यात आघाडीवर आहे. त्याने 110 सामन्यात 6707 धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

‘रन मशीन’ कोहली (Run Machin Kohli) इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू होण्यापासून 72 धावा दूर आहे. तो राहुल द्रविडला मागे टाकू शकतो, ज्याने इंग्लंडमध्ये 46 सामन्यांत 2646 धावा केल्या आहेत. द्रविडने इंग्लिश मैदानांवर आठ शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. तर कोहलीने इंग्लंडमध्ये 56 सामन्यांमध्ये 2574 धावा केल्या असून यात तीन शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने 43 सामन्यात 7 शतके आणि 12 अर्धशतकांसह 2625 धावा फटकावल्या आहेत.

सर्वाधिक आयसीसी नॉकआउट सामने (icc knockout matches) खेळण्याचा विक्रम पॉन्टिंगच्या नावावर आहेत. त्याने आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये एकूण 18 सामने खेळले आहेत. या यादीत युवराज सिंग (17) दुसऱ्या स्थानावर असून त्याच्यापाठोपाठ विराट कोहली, सचिन आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांचा क्रमांक लागतो. या तिघांनी प्रत्येकी 15 सामने खेळले आहेत. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये (WTC Final) मैदानात उतरताच कोहली सचिन आणि धोनीला मागे टाकून सर्वात जास्त आयसीसी नॉकआऊट सामने खेळणारा तिसरा खेळाडू बनेल.

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 च्या अंतिम सामन्यात शतक झळकावले. त्यानंतर एकाही भारतीय खेळाडूने आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावलेले नाही. विराटने शतक झळकावले तर तो 23 वर्षांचा दुष्काळ संपवू शकतो.

Back to top button