WTC फायनलपूर्वी राहुल द्रविडचे मोठे विधान, म्हणाला, १० वर्षात…

WTC फायनलपूर्वी राहुल द्रविडचे मोठे विधान, म्हणाला, १० वर्षात…

पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारताने गेल्या १० वर्षांत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला कठोर परिश्रम करणे हा एकच प्लॅन असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने मात्र WTC फायनलपूर्वी संघावर कोणतेही दडपण नाही. गेली दोन वर्षे संघ ज्यासाठी मेहनत घेत आहे, ती ट्रॉफी जिंकणे महत्वाचे ठरेल, असे म्हटले आहे.

भारतीय संघाला २०२१ च्या WTC फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तर इतर आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरीतच बाहेर पडला होता. टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती.

ICC ट्रॉफी न जिंकल्याबद्दल द्रविड म्हणाला…

द्रविड म्हणाला, आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आमच्यावर कोणतेही दडपण नाही. ही ट्रॉफी जिंकणे महत्वाचे आहे. कारण यासाठी आम्ही दोन वर्ष परिश्रम केले आहेत. अनेक यश मिळवूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे आमच्याकडे अनेक सकारात्मक पैलू आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका जिंकणे, येथे (इंग्लंडविरुद्ध) मालिका बरोबरीत आणणे यासह प्रत्येक संघाला सर्वत्र टक्कर देण्याची क्षमता या संघात आहे. आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही म्हणून या गोष्टी बदलणार नाहीत. ही खरोखरच एक उत्तम संधी असल्याचे त्यांने म्हटले आहे.

रहाणेने संधी म्हणून पाहू नये

मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे १८ महिन्यांत पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यातील अपयशामुळे त्याच्या कारकिर्दीचा शेवट होऊ शकतो. द्रविडने या फलंदाजाला सल्ला दिला आहे. रहाणे संघासोबत आहे हे चांगले आहे. काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. आमच्याकडे कौशल्य आणि अनुभव असलेला खेळाडू आहे हे चांगले आहे.

रहाणेच्या आगमनाने संघात अनुभव वाढला आहे. तो परदेशात चांगली कामगिरी करत आला आहे. इंग्लंडमध्येही तो चांगला खेळला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगले यश मिळवले आहे. त्याने ही एकमेव संधी म्हणून पाहू नये असे मला वाटते. चेतेश्वर पुजाराने अलीकडे काऊंटी क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. त्याचा सल्ला संघासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो, असेही द्रविडने सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news