

देहू, आळंदीहून ज्ञानोबा-माऊली-तुकोबारायांच्या पालख्या जशा पंढरपूरकडे वेगवेगळ्या मार्गस्थ होतात, त्याप्रमाणे आयपीएलमधून मोकळ्या झालेल्या आपल्या कोहली, शर्मा यांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने इंग्लंडला मार्गस्थ झाल्या. आयपीएलचा अंतिम सामना लांबल्याने शेवटची शमी, गिल, रहाणे, भरत आणि जडेजा यांची पालखी इंग्लंडला एक दिवस उशिरा पोहोचली आणि आपला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा संघ पूर्ण झाला. या महत्त्वाच्या सामन्याला भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियाचा संघही सराव सामन्याशिवाय तयार होत आहे. भारतीय संघ सराव सामने टाळायची सबळ कारणे देत असला, तरी क्रिकेटमध्ये मॅच प्रॅक्टिसला पर्याय नाही. विशेषतः, पुजारा वगळता सर्व खेळाडू आयपीएलसारख्या दीर्घ चाललेल्या, उष्ण आणि दमट हवामानाच्या मैदानातून थंड हवेच्या देशात थेट कसोटी खेळायला जात आहेत, तेव्हा सर्वात मोठा बदल त्यांना आत्मसात करायचा आहे तो मानसिकतेत. टी-20 क्रिकेटमध्ये, सीमारेषा गरजेपुरत्याच ठरवून जी फटकेबाजी चालते ती चालून जाते; पण कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज चेंडूइतकेच किती वेळ क्रीझवर उभा राहतो यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या दोन महिन्यांत जो टी-20 च्या वेगानुसार खेळाचा वेग होता, तो गुंडाळून फलंदाजी करायची आहे आणि यासाठी एक सामना अगदी दोन दिवसांचा खेळला असते, तरी उत्तम झाले असते. (WTC Final)
आपल्या संघातून अंतिम अकरा खेळाडूंचा विचार करायचा तर रोहित शर्मा-शुभमन गिल सलामीला असतील. त्यानंतर येतील ते पुजारा, कोहली आणि रहाणे. या पाच फलंदाजांनी भारताची सलामी आणि मधली फळी ऑस्ट्रेलियापेक्षा कागदावर तरी मजबूत वाटते. शुभमन गिल आयपीएलमध्ये स्वप्नवत फॉर्ममध्ये होता; पण आयपीएलची परिमाणे इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळताना लावता येणार नाहीत. गिलला सामन्याची तयारी करायला त्याच्या आयपीएलच्या कामगिरीपेक्षा 2021 च्या ब्रिस्बेन कसोटीतील 91 धावांची खेळी जास्त प्रेरणादायी असेल. याच न्यायानुसार रोहित शर्मा जरी आयपीएलमध्ये अपयशी ठरला असला, तरी तो कसोटीत तसाच खेळेल, असे नाही. या शर्मा-गिल जोडीवर एक उत्तम सुरुवात करून द्यायची मोठी जबाबदारी आहे. सलामीनंतर येणारा पुजारा या वातावरणात गेले दोन महिने खेळत असल्याने त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत; पण या अपेक्षांचे दडपण त्याच्यावर नक्की असणार. विराट कोहलीने 2014 चे अपयश 2018 च्या मालिकेत 500 हून अधिक धावा काढून पुसले आहे. इंग्लंडमध्ये खेळलेल्या 16 कसोटींच्या 31 डावांत त्याने 33.32 च्या सरासरीने 1,033 धावा काढल्या आहेत. टी-20 प्रकारातून स्विच ऑफ होऊन कसोटी खेळण्याचा कोहली आणि रहाणेचा अनुभव आपल्याला उपयोगी पडेल. पुजारा-कोहली किंवा कोहली-रहाणे यापैकी एक भागीदारी एकतर डाव सावरेल किंवा उत्तम सलामी मिळाली तर डावाला आकार देईल. पॉन्टिंगने राखीव सूर्यकुमार यादवला संधी द्यायला हवी, असे मत व्यक्त केले आहे; पण तो ऑस्ट्रेलियन सामन्यापूर्वीच्या शाब्दिक युद्धाचा प्रकार वाटतो. अजिंक्य रहाणेने हाताशी असलेल्या संघाला घेऊन जो विजय ऑस्ट्रेलियात मिळवला हे ऑस्ट्रेलियन कदापि विसरणार नाहीत. त्याच्या त्या मेलबर्नच्या शतकाची गणना भारतीयांच्या परदेशातील सर्वोत्तम शतकांत होते. तेव्हा रहाणेला त्याचे यावर्षीचे फलंदाजीचे सातत्य बघता सध्या तरी पर्याय नाही. या पाचनंतर जडेजा सहाव्या क्रमांकावर असेल. (WTC Final)
ईशान किशन की भरत? हा चर्चेचा विषय आहे; पण यांची निवड आपल्या गोलंदाजीच्या निवडीवर असेल. ईशान किशन हा आयपीएलमध्ये उत्तम खेळला, तर भरतला हार्दिक पंड्याने एकही संधी दिली नाही. तेव्हा भरतला सध्या कुठच्याही सामन्याचा सराव नाही. हे जरी असले तरी भरत हा कसोटी दर्जाचा आणि कसोटी अनुभवाचा यष्टिरक्षक आहे, तर किशनने इतक्या मोठ्या सामन्यात पदार्पण केले तर तो कदाचित दडपणाखाली असेल. दुसरे असे की, इंग्लंडमध्ये यष्टिरक्षण हीसुद्धा एक कला असते. ऋषभ पंतने 2018 च्या नॉटिंगहॅम कसोटीत जेव्हा पदार्पण केले होते तेव्हा जरी पहिल्या डावात त्याने 5 झेल घेतले, तरी स्टम्पच्या पाठी होणार्या चेंडूच्या स्विंगवर त्याची तारांबळ उडाली होती. (WTC Final)
भारतातर्फे शामी, सिराज हे नक्की असतील. उमेश यादव, शार्दूल ठाकूर, अश्विन, अक्षर आणि उनाडकट यातले दोन आपल्याला निवडायचे आहेत. यात उनाडकट आणि उमेश यादव हे नुकतेच दुखापतीतून सावरले आहेत आणि या वातावरणात त्यांना संधी मिळणे कठीण आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू गुणांमुळे त्याचप्रमाणे त्याच्या चेंडूच्या वेगातील वैविध्यामुळे तो संघात असेल आणि अश्विनची फलंदाजीची क्षमता, 5 कसोटी शतकेही बघता अश्विन आणि अक्षर यात अश्विनला झुकते माप मिळेल. हे असे झाले तर गेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासारखे आपण 3+2 खेळवणार आहोत आणि भरत यष्टिरक्षक असेल. मात्र, ऐनवेळी ढगाळ हवा बघून अश्विनऐवजी उमेश यादवला अथवा उनाडकटला घेतले, तर अष्टपैलू अश्विन कमी झाल्याने फलंदाजी मजबूत करायला ईशान किशनला संधी मिळू शकते. गेल्या अजिंक्यपद अंतिम सामन्यात तेव्हा न्यूझीलंडने पाच जलदगती गोलंदाज खेळवले होते; पण साऊथॅम्पटन आणि ओव्हलच्या वातावरणात आणि खेळपट्टीत फरक आहे. इथे जरी सर्व लक्ष आपण हेजलवूड, स्टार्क, लायन यांच्यावर करत असलो, तरी तेव्हा न्यूझीलंडच्या कायली जेमिसनच्या उंचीचा फायदा घेऊन केलेल्या गोलंदाजीने आपण ग्रासलो होतो. यासमच काहीसे कॅमेरून ग्रीनच्या बाबतीत होऊ शकते.
भारतीय फलंदाजांना प्रामुख्याने सामना करायचा आहे तो म्हणजे इंग्लिश लहरी हवामानाचा, ओव्हलच्या ताज्या खेळपट्टीचा आणि लाल चेंडूचा. आठवड्याच्या अंदाजाने कसोटीच्या पहिल्या दोन दिवशी ऊन आणि ढगांचा लपंडाव आहे आणि पुढचे तीन दिवस सूर्यप्रकाश आहे. त्याचप्रमाणे पहिल्या दोन दिवशी जोडीला वार्याची झुळूक असणार आहे. 1880 सालापासूनच्या ओव्हलच्या आजवरच्या 104 कसोटी सामन्यांपैकी बहुतांशी सामने हे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळवले आहेत, केवळ 9 सामने हे जुलैमध्ये खेळवले आहेत तर जूनमध्ये खेळला जाणारा ओव्हलच्या इतिहासातील हा पहिलाच सामना आहे. तेव्हा ओव्हलची आजवरची आकडेवारी या सामन्यासाठी विशेष कामाची नाही. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत इंग्लंडमधल्या खेळपट्ट्यांवर कौंटी सामने खेळले जाऊन गवत जुने होते; पण या अंतिम सामन्याला आपल्याला खेळपट्टी ही नवी असणार आहे, ज्यावर ताजे गवत असेल. आयसीसीच्या नियमाप्रमाणे यजमान देशातील चेंडू सामन्याला वापरला जातो तेव्हा ना ऑस्ट्रेलियाचा कुकाबुरा, ना भारताचा एसजी, तर इंग्लंडचा ड्यूक चेंडू या सामन्याला वापरणार आहेत. ड्यूक चेंडू हा हाताने बनवल्यामुळे त्याची शिवण उठावदार असते, त्याच्या गडद लाल रंगावर जे लेकरचे कोटिंग असते त्याने तो जास्त गडद दिसतो, बराच काळ स्विंग होतो. ओव्हलची पारंपरिक खेळपट्टी फारसे गवत न राखता फिरकीपटूंना मदत करणारी आणि फलंदाजीला पोषक असते, तेव्हा ती दोन दिवसांनी तशी होईलच; पण जर हवामानाचा अंदाज बुधवारपर्यंत असाच राहिला, तर नाणेफेक जिंकणारा संघ पहिली गोलंदाजी घेईल आणि नव्या चेंडूला पोषक घटकांचा फायदा घेईल. टीम इंडियाला विश्रांतीचा अभाव बहुतांशी भारतीय खेळाडू हे आयपीएलच्या थकव्यातून इथे खेळायला येत आहेत. त्यांचे वर्क-लोड ना त्यांच्या संघमालकांनी सांभाळले, ना बीसीसीआयने. कुठच्याही खेळाडूच्या स्नायूंना पुन्हा बळकट होण्यास विश्रांतीची गरज असते. टी-20 खेळ जरी तीन-साडेतीन तासांत संपत असला, तरी त्यात दमवणूक प्रचंड असते. त्याचप्रमाणे प्रत्येक षटकानुसार सामन्याचे गणित बदलत असल्याने अखंड मानसिक दडपण असते. यात वापरल्या जाणार्या बॅट या विशेष असतात. त्या जड असतात. सतत दोन महिने त्या वापरल्या जाण्याने स्नायूंवर परिणाम नक्कीच होतो. आपल्या संघाने क्रिकेट पंढरीचे शहर तर टप्प्याप्प्याने गाठले आहे. आता दहा वर्षांनी आयसीसी ट्रॉफीचा गाभारा आपल्याला उघडतो का, हे बुधवारच्या पहिल्या सत्रात कळेल.
– निमिष पाटगावकर
हेही वाचा;