Asia Cup 2023 : पाकिस्तानला झटका? आशिया चषक श्रीलंकेत खेळवण्याच्या हालचाली

दुबई; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हातून आशिया कप 2023 चे यजमानपद जवळपास गेले आहे. याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी आशिया कप श्रीलंकेत खेळवण्याच्या जोरदार हालचाली एशियन क्रिकेट कौन्सिलने सुरू केल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोडींमुळे बिथरलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंका क्रिकेट संघटनेलाच धमकी देण्याचा प्रयत्न केला. (Asia Cup 2023)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेसोबतची द्विपक्षीय वन-डे मालिका खेळण्यास नकार दिला आहे. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेने आपल्या देशात आशिया कप 2023 चे आयोजन करण्यामध्ये रस दाखवला. त्यामुळे आता पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे. (Asia Cup 2023)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये कटुता आल्याचे एक उदाहरण म्हणजे पीसीबीने श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणारी वन-डे मालिका खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढच्या सर्कलनुसार यावर्षी जुलै महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेत जायचे आहे.
श्रीलंकेने या दोन कसोटी मालिकांसोबतच तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर ठेवला होता. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सुरुवातीला यावर विचार करतो, असे सांगितले आणि आता हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.
यावरून श्रीलंका सप्टेंबरमध्ये होणार्या आशिया कपचे यजमानपद भूषवण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेच्या या प्रस्तावानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर नाराज झाल्याचे स्पष्ट होत आहे. रोटेशननुसार यावेळचा आशिया कप पाकिस्तान आयोजित करणार होता. मात्र, भारताने पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने आता आशिया कप पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत खेळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा;