Odisha train collision : अपघाताची घटना वेदनादायी, दोषींवर कठोर कारवाई करणार | पुढारी

Odisha train collision : अपघाताची घटना वेदनादायी, दोषींवर कठोर कारवाई करणार

बालासोर; वृत्तसंस्था : ओडिशातील बालासोर येथील अपघातस्थळाला भेट दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी द़ृश्य पाहून हेलावले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी हा अपघात अतिशय वेदानादायी असल्याचे सांगत या प्रकरणाच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले व दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल, असे जाहीर केले. जखमींच्या उपचारात सरकार कसलीही कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Odisha train collision)

अपघाताचे वृत्त कळाल्यापासून पंतप्रधान स्थितीवर लक्ष ठेवून होते. सकाळी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर ते ओडिशाकडे रवाना झाले. बालासोर येथे दाखल झाल्यावर हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने ते बहानगा बाजार या अपघातस्थळी दाखल झाले. तेथे त्यांनी आधी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अपघाताबाबत माहिती घेतली. अपघातस्थळी सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली. त्यांनी स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ, रेल्वे अधिकार्‍यांशी तेथे चर्चा केली. एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांना व्यक्तीशः लक्ष घालून जखमींना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व ती मदत करण्याच्या सूचना केल्या. ज्यांनी या अपघातात आपले जीवलग गमावले त्यांच्या कुटुंबीयांची विशेष काळजी घेण्याचे व त्यांच्या मदतीत कसूर होता कामा नये, अशी सक्त ताकीद दिली. (Odisha train collision)

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बालासोरच्या फकीर मोहन हॉस्पिटलला भेट दिली. तेथे उपचार घेत असलेल्या जखमींची त्यांनी आस्थेने विचारपूस केली व सर्वतोपरी मदतीची ग्वाही त्यांना दिली. माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बालासोरची रेल्वे दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसूर करणार नाही. हा अपघात अत्यंत गंभीर असून त्याची सर्व अंगांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल. रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे काम रेल्वे करत आहे. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी घेतला आढावा

शनिवारी सकाळी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ओडिशातील बालासोर रेल्वे अपघाताचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंतप्रधानांना रेल्वे अपघातासंबंधी माहिती देण्यात आली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पंतप्रधान घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, शुक्रवारीच पंतप्रधानांनी रेल्वे अपघातानंतर दु:ख व्यक्त केले होते. अपघातात मृत्युमुखी तसेच गंभीर जखमी झालेल्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा; 

Back to top button