WTC Final 2023 : ओव्हलवर वापरला जाणार भारताच्या पसंतीचा ड्यूक चेंडू! | पुढारी

WTC Final 2023 : ओव्हलवर वापरला जाणार भारताच्या पसंतीचा ड्यूक चेंडू!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पसंतीचा ड्यूक चेंडू वापरला जाणार असल्याचे आता निश्चित केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ही लढत कुकाबुरा चेंडूवर खेळवली जाईल, असे म्हटले होते. मात्र, आता ड्यूक चेंडूवर शिक्कामोर्तब केले गेले आहे. एरवी, कुकाबुरा चेंडू ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये वापरला जातो तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व झिम्बाब्वे येथील सामनेही याच चेंडूवर खेळवले जातात. इंग्लंडमध्ये प्रारंभापासूनच ड्यूक चेंडू वापरला जात असून दोन वर्षांपूर्वीची डब्ल्यूटीसी फायनल या चेंडूवरच झाली होती. भारतात एरवी एसजी चेंडू वापरला जातो. मात्र, बुमराह, उमेश यादव या गोलंदाजांनी यापूर्वी ड्यूक चेंडूबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (WTC Final 2023)

ओव्हलवर ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड सर्वात खराब

इंग्लंडमधील 140 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचे सर्वात खराब रेकॉर्ड ओव्हल मैदानावर राहिले आहे. इंग्लंडमध्ये 1880 मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना ओव्हलवर खेळवला गेला होता. या मैदानावर ऑस्ट्रेलियाला आजवर केवळ 7 सामने जिंकता आले आहेत. ऑस्ट्रेलियाने इंग्लिश भूमीत लॉर्डस् मैदानावर सर्वाधिक यश मिळवले असून तेथे त्यांची विजयाची टक्केवारी 43.59 इतकी राहिली आहे.

काय आहेत ड्यूक चेंडूची वैशिष्ट्ये?

  • ड्यूक हा क्रिकेटमध्ये वापरला जाणारा हा सर्वात जुना चेंडू आहे.
  • कुकाबुरा व एसजी चेंडूच्या तुलनेत अधिक गडद रंग. ((WTC Final 2023))
  • ड्यूक पूर्णपणे हाताने तयार केलेला असतो.
  • इंग्लिश वातावरणात हा चेंडू स्विंग गोलंदाजांना अधिक पोषक ठरतो.

हेही वाचा;

Back to top button