MS Dhoni Knee Surgery : धोनीच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया! IPLच्या पुढच्या हंगामात धमाका करण्यास सज्ज | पुढारी

MS Dhoni Knee Surgery : धोनीच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया! IPLच्या पुढच्या हंगामात धमाका करण्यास सज्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Knee Surgery : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आयपीएलमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे खूप अस्वस्थ दिसत होता. मात्र, धोनीने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून ते फायनलपर्यंत संघर्ष केला आणि संघाला पाचव्यांदा चॅम्पियन बनवले. पण या विजयाचा आनंद साजरा करत असताना धोनीला बुधवारी (31 मे) रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्याच्या दुस-याच दिवशी म्हणजे गुरुवारी (1 जून) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्या गुडघ्यावर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी केली असून त्यांनीच जखमी ऋषभ पंतच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया केली आहे.

आयपीएलच्या (IPL) 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात अनुभवी यष्टिरक्षक धोनीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्धच्या त्या सामन्यात चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला होता. धोनीने (MS Dhoni) 19 व्या षटकात दीपक चहरने टाकलेला चेंडू पकडण्यासाठी डायव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो खूप अडचणीत दिसला. (MS Dhoni Knee Surgery)

धोनीचा व्हिडिओ व्हायरल

गुजरातविरुद्धच्या फायनलनंतर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने फलंदाजीला येण्यापूर्वी गुडघ्यावर पट्टी बांधली होती. अंतिम सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला. 41 वर्षीय धोनीने खालच्या ऑर्डरमध्ये फलंदाजी येत मोठे शॉट्स खेळणे पसंत केले. एकप्रकारे दुखपतीमुळे त्याने पळून धावा घेण्याचे टाळले. त्याने आयपीएल 2023 मध्ये 16 सामन्यांमध्ये 26.00 च्या सरासरीने आणि 182.46 च्या स्ट्राइक रेटने 104 धावा केल्या. यादरम्यान, धोनीने 10 षटकार आणि 7 चौकार मारले. तो 8 वेळा नाबाद राहिला. धोनी सेनेने अहमदाबादमध्ये पावसाने प्रभावित झालेला विजेतेपदाचा सामना पाच गडी राखून जिंकला आणि इतिहास रचला. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत सीएसकेने मुंबई इंडियन्सची (MI) बरोबरी केली आहे. (MS Dhoni Knee Surgery)

निवृत्तीचा सर्वस्वी निर्णय धोनीचा

अलीकडेच, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले होते की, ‘हे खरे आहे की धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. तो या दुखापतीवर डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे आणि त्यानुसार निर्णय घेईल. शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का, हे अहवाल आल्यानंतरच कळेल.’ विश्वनाथ यांना धोनी पुढच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेईल अशी शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘सीएसके त्या गोष्टीचा विचारही करत नाही कारण आम्ही अद्याप त्या टप्प्यावर आलेलो नाही. निवृत्ती घेणे, न घेणे हा सर्वस्वी धोनीचा निर्णय असेल. पण सीएसकेच्या भूमिकेवरून मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही याबद्दल काहीही विचार केलेला नाही,’ असे स्पष्ट केले होते.

आणखी एक हंगाम खेळणे हीच त्यांना माझी भेट : धोनी

आयपीएल 2023 हा धोनीचा (MS Dhoni) खेळाडू म्हणून शेवटचा हंगाम असू शकतो, असे बोलले जात होते. मात्र धोनीने पुढील वर्षीही आयपीएलमध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. अंतिम सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘परिस्थिती बघितली तर माझ्यासाठी निवृत्तीची ही सर्वोत्तम वेळ आहे. मी आता निवृत्त होतोय हे सांगणे माझ्यासाठी खूप सोपे आहे पण पुढचे नऊ महिने कठोर परिश्रम करून पुनरागमन करून आणखी एक हंगाम खेळणे कठीण आहे. शरीराने साथ देणे महत्त्वाचे आहे. चाहत्यांनी माझ्यावर ज्याप्रकारे प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यामुळे आणखी एक हंगाम खेळणे हीच त्यांना माझी भेट असेल. त्यांनी जे प्रेम आणि तळमळ दाखवली, मीही त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली होती.

Back to top button