CSK 2023 : ‘सीएसके’चा शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ | पुढारी

CSK 2023 : ‘सीएसके’चा शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ

मुंबई; वृत्तसंस्था : महेंद्रसिंग धोनीच्या ‘सीएसके’ने आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सला नमवत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. क्रिकेट विश्वात फकक्त एकच नाव चर्चेत आहे. ते म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. (CSK 2023)

गेल्या पाच वर्षांत महेंद्रसिंग धोनीची कमाई देखील वेगाने वाढली आहे. याच वेगात सीएसके स्टॉक्सने अनलिस्टेड मार्केटमध्येही तेजी आणली आहे. हा स्टॉक पाच वर्षांत 15 पट वाढला आहे.

धोनीसह ‘सीएसके’मधील इतर खेळाडू देखील चांगली कमाई करतात. गेल्या 16 हंगामात आयपीएलमधून 178 कोटी रुपये कमावले आहेत. ‘सीएसके’ने त्यांच्या गुंतवणूकदारांवर देखील पैशांचा वर्षाव केला आहे. अनलिस्टेड मार्केटिंगमध्ये जिथे प्री आयपीओ स्टॉकची खरेदी केली जाते. तिथे कंपनीचा शेअर 160-165 रुपयांवर व्यवहार करत आहे. (CSK 2023)

जेव्हा ‘सीएसके’चे शेअर्स इंडिया सिमेंटस्मधून डिमर्ज केले गेले तेव्हा इंडिया सिमेंटस्च्या स्टॉकहोल्डर्सना 1:1 च्या प्रमाणात शेअर्स मिळाले. त्यावेळी एका शेअरची किंमत 12-15 रुपये होती. यानंतर देशात कोरोना महामारीच्या काळातही किंमत 48-50 रुपयांपर्यंत वाढली होती. ‘सीएसके’चे मूल्य सुमारे 9,442 कोटी रुपये आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षासाठी, कंपनीने निव्वळ महसुलात 38 टक्के वाढ नोंदवली आहे.

आयपीएलची ब्रँड व्हॅल्यूही वाढली

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील दुसरी सर्वात मौल्यवान स्पोर्टस् लीग म्हणून उदयास आली आहे. नवीन मीडिया अधिकारांचा लिलाव आणि गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंटस् या दोन नवीन संघांचा समावेश झाल्यामुळे ब्रँड व्हॅल्यू 8.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे.

हेही वाचा;

Back to top button