Wrestlers In Haridwar : पदके गंगार्पण करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय स्थगित; नरेश टिकैत यांची मध्यस्थी | पुढारी

Wrestlers In Haridwar : पदके गंगार्पण करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय स्थगित; नरेश टिकैत यांची मध्यस्थी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बृजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी करणार्‍या आंदोलक कुस्तीपटूंनी आपली पदके गंगा नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु शेतकरी नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हरिद्वार येथे ही पदके विसर्जित करण्यात येणार होती; परंतु आता हे कुस्तीपटू दिल्लीला परतले आहेत. त्यांनी आपली पदके नरेेेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. (Wrestlers In Haridwar)

नरेश टिकैत यांनी हरिद्वार येथे धाव घेतली आणि कुस्तीपटूंना आपली पदके विसर्जित न करण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की, खेळाडूंची ही पदके देशाचा अभिमान आहेत. त्यांना गंगेत अर्पण करू नका. वाटल्यास ही पदके राष्ट्रपतींना सोपवू. टिकैत यांच्याबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा खेळाडूंना पदके गंगेेत विसर्जन न करण्याची विनंती केली होती. (Wrestlers In Haridwar)

कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलन करणार्‍या कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या तिघांनीही सोशल मीडियावर एकसारखेच ट्विट करत आपली याविषयीची भूमिका मांडली होती. त्यानुसार हे कुस्तीपटू पदके गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे पोहोचले होते. (Wrestlers In Haridwar)

हरिद्वारला पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना कुस्तीपटू म्हणाले की, हे सरकार त्यांचे ऐकायला तयार नाही. आरोपी खासदारावर कारवाईदेखील करत नाही, असे असेल तर मग देशासाठी जिंकलेल्या या पदकांचा काय उपयोग. ही पदके गंगेत विसर्जित करण्यासाठी आम्ही आलो आहोत. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, संगीता फोगट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक आंदोलक कुस्तीपटू हरिद्वारला पोहोचले आहेत. गंगातिरी पोहोचलेल्या कुस्तीपटूंना यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले. कुस्तीपटू येथे ओक्साबोक्शी रडताना दिसले. या कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

अनिल कुंबळे यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा केला निषेध

दुसरीकडे, २८ मे रोजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. कुस्तीपटूंना पाठिंबा देताना ते म्हणाले की, 28 मे रोजी आमच्या कुस्तीपटूंवर झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून निराशा झाली. योग्य संवादाने कोणतीही गोष्ट सोडवता येते. लवकरात लवकर तोडगा निघावा ही अपेक्षा.

२८ मे रोजी काय घडले ?

एकीकडे २८ मे रोजी देशाला नवी संसद मिळाली. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंवर कडक कारवाई केली. दिल्लीचे रस्ते जणू कुस्तीचा आखाडा झाला होता. त्याचे असे झाले की २८ मे रोजी पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार होते. त्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी जंतरमंतर येथून नव्या संसदेच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी बॅरिकेडिंगच्या मदतीने कुस्तीपटुंना रोखले. यादरम्यान दोघांमध्ये झटापट झाली. या घटनेचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र निषेध केला.

अधिक वाचा :

Back to top button