Sundar Pichai On IPL 2023 Final : चेन्नईच्या विजयावर गुगलच्या सुंदर पिचाईंची प्रतिक्रीया; वाचा काय म्हणाले... | पुढारी

Sundar Pichai On IPL 2023 Final : चेन्नईच्या विजयावर गुगलच्या सुंदर पिचाईंची प्रतिक्रीया; वाचा काय म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जने (CSK) पाचव्यांदा आयपीएल फायनलचे विजेतेपद पटकावले. रोमहर्षक अशा अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) ५ गडी राखून पराभव केला. हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेर, एमएस धोनीची (Mahendra Singh Dhoni) राजवट कायम राहिली. चेन्नई सुपर किंग्ज आणि एमएस धोनीचे समर्थकही या विजयाने आनंदित झाले होते. धोनीचे जबरा फॅन केवळ सामान्य क्रिडाप्रेमीच नव्हे तर अनेक बडे व्यक्ती देखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, त्यांनीही चेन्नई सुपर किंग्जचे अभिनंदन करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. (Sundar Pichai On IPL 2023 Final)

कसे केले सुंदर पिचाई यांनी सीएसकेचे अभिनंदन? (Sundar Pichai On IPL 2023 Final)

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचा (IPL) ऐतिहासिक सामना जिंकल्यावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai)यांनीही अभिनंदन केले. सुंदर पिचाई यांनी ट्विट केले, त्यांनी ट्वीटमध्ये लिहले आहे, ‘काय फायनल! नेहमीप्रमाणे ग्रेट टाटा आयपीएल (TATA IPL 2023), अभिनंदन CSK! गुजरात टायटन्स पुढील वर्षी मजबूतीने पुनरागमन करेल’.

चेन्नईने आयपीएलमध्ये पाचव्यांदा अंतिम विजेतेपद पटकावले

आयपीएलचा अंतिम सामना खूपच रोमांचक झाला. डकवर्थ लुईस पद्धतीने चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नईने शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईने पाचवे विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी, गुजरातने ४ गड्यांच्या मोबदल्यात २१४ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. साई सुदर्शनने ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. त्याच्याशिवाय ऋद्धिमान साहाच्या बॅटमधूनही अर्धशतकी खेळी झाली.


अधिक वाचा :

Back to top button