IPL : १५ वर्षांमध्‍ये सात विजेते, जाणून घ्‍या आयपीएल विजेत्‍यांचा इतिहास... | पुढारी

IPL : १५ वर्षांमध्‍ये सात विजेते, जाणून घ्‍या आयपीएल विजेत्‍यांचा इतिहास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील फायनल गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (दि.२८) खेळवण्यात येणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी गुजरात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून चेन्नई आणि मुंबई्च्या विक्रमाशी बरोबरी करणार की, चेन्नई विजेतेपद पटकावून पाचव्यांदा मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. काही तासांमध्ये आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळेल पण त्याची उत्सुकता अवघ्या क्रिकेट प्रेमींना लागली आहे. या निमित्ताने जाणून घेऊया आजपर्यंत आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या विजेत्यासंघाबाबत… (IPL)

२००८ – राजस्थान रॉयल्स :

पहिल्‍या आयपीएल ट्रॉफीवर ऑस्‍ट्रेलियाचा जगविख्‍यात फिरकीपटू शेन वॉर्न याच्‍या नेतृत्त्‍वाखालील राजस्‍थान रॉयल्‍स हा संघ २००८ मध्‍ये आयपीलए विजेता ठरला. या हंगामाच्या फायनल सामन्यामध्ये राजस्थानला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आव्हान दिले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतान चेन्न्ईने राजस्थानला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने निर्धारित २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून पार केले. सामन्यात चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या युसूफ पठाणने अर्धशतकी खेळी केली होती. (IPL)

२००९ – डेक्कन चाजर्स :

२००९ साली झालेल्या आयपीएचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट याच्या नेतृत्वात डेक्कन चाजर्सने पटकावले. यावेळी फायनलमध्ये डेक्कन चाजर्सला अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आव्हान दिले होते. फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना डेक्कन चाजर्सने बेंगलोरला १४३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन चाजर्सने बेंगलोरला १३७ धावांवर रोखले. (IPL)

२०१० – चेन्नई सुपर किंग्ज :

२०१० साली झालेल्या आयपीएलच्या तिसऱ्या हंगामावर धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने विजेतेपदाला गवसणी घातली होती. या हंगामाच्या फायनलमध्ये चेन्नईला सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आव्हान दिले होते. या सामन्यात मुंबईचा २२ धावांनी पराभव करत चेन्नईने पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. (IPL)

२०११ – चेन्नई सुपर किंग्ज :

२०११ साली झालेल्या आयपीएल हंगामावर चेन्नईने दुसऱ्यांदा विजेतेपद मोहर उमटवली. या हंगामाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या इओन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनी चेन्नईला आव्हान दिले होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या फाफ डु प्लेसिस केलेल्या ८६ धावाच्या खेळीने कोलकाताला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता निर्धारीत २० ओव्हरमध्ये १६५ धावांच करू शकला. यासह चेन्नईने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. (IPL)

२०१२ – कोलकाता नाईट रायडर्स :

२०१२ साली झालेल्या आयपीएलच्या पाचव्या हंगामाचे गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले. या हंगामाच्या फायनलमध्ये कोलकाताला धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने आव्हान दिले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत चेन्नईने कोलकाताला विजयसाठी १९१ धावांचे आव्हान दिले होते. यामध्ये चेन्नईच्या मायकल हसी आणि सुरेश रैना यांनी अर्धशतकी खेळी केली होती. हे आव्हान कोलकाताने ५ विकेट राखून पार केले. यामध्ये मविंदर बिस्ला आणि द. आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने केलेल्या तुफानी अर्धशतकी खेळाच्या जोरावर १९.४ ओव्हरमध्ये हे आव्हान पार केले.

२०१३ – मुंबई इंडियन्स

२०१३ साली झालेल्या आयपीएलच्या सहाव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. यावेळी झालेल्या फायनलमध्ये मुंबईला धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईचे आव्हान होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने चेन्नईला १४८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला १२५ धावांच करता आल्या. यासह मुंबईने २३ धावांनी सामना जिंकत पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

२०१४ : कोलकाता नाईट रायडर्स

२०१४ साली झालेल्या आयपीएलच्या सातव्या हंगामात गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटाकावले. फायनलमध्ये कोलकाताला पंजाबने आव्हान दिले होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने कोलकाताला २०० धावांचे आव्हान दिले होते. यामध्ये वृध्दीमान साहाने शतकी तर मनन वोराने अर्धशतकी खेळी केली होती. या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताकडून मनीष पांड्येने ९४ धावांची महत्वाची खेळी करत संघाला विजेतेपद पटकावून दिले.

२०१५ – मुंबई इंडियन्स :

२०१५ साली झालेल्या आयपीएलच्या आठव्या हंगामामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने बाजी मारत दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यावेळी फायनलमध्ये मुंबईला धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने आव्हान दिले होते. फायनल सामन्यात मुंबईच्या सिमन्स आणि रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नईला २०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ निर्धारीत २० ओव्हरमध्ये १६१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

२०१६ : सनरायजर्स हैदराबाद :

२०१६ साली झालेल्या आयपीएलच्या हंगामात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने विजेतेपद पटकावले. या फायनल सामन्यात हैदराबादला विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेंगलोरने आव्हान दिले होते. स्पर्धेच्या फायनल सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने बेंगलोरला २०९ धावांचे आव्हान दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना बेंगलोरला २०० धावांपर्यत मजल मारता आली.

२०१७ – मुंबई इंडियन्स :

२०१७ साली झालेल्या आयपीएलच्या दहाव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने स्पर्धेचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. यावेळी झालेल्या फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये खेळणाऱ्या रायझिंग पुणे सुपर जायंट्सने तगडे आव्हान दिले होते. या स्पर्धेच्या फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पुण्याला १२९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सामन्यात पुण्याला अवघ्या एका धावाने पराभव स्वीकारावा लागला होता.

२०१८ : चेन्नई सुपर किंग्ज :

२०१८ साली झालेल्या आयपीएलच्या अकराव्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंड्च्या केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने आव्हान दिले होते. सामन्यात चेन्नईने हैदराबादला विजयासाठी १८१ धावाचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला १७८ धावांच करता आल्या.

२०१९ : मुंबई इंडियन्स :

२०१९ साली झालेल्या आयपीएच्या बाराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने स्पर्धा जिंकली. या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आव्हान दिले होते. फायनल सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईने चेन्नईला १४९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला १४८ धावा करता आल्या. यासह मुंबईने सामन्यात अवघ्या एका धावाने विजय मिळवला.

२०२० – मुंबई इंडियन्स :

आयपीएलचा तेरावा हंगाम २०२० साली खेळवण्यात आला. या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकवण्याचा मान मिळवला. याच्या आधी चेन्नईने ही कामगिरी केली होती. हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने आव्हान दिले होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने मुंबईला १५६ धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे लक्ष १८.४ ओव्हरमध्ये पार करत विजेतेपद पटकावले.

२०२१ – चेन्नई सुपर किंग्ज :

२०२१ साली झालेल्या आयपीएल हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज ठरला. यावेळी चेन्नईचे नेतृत्व धोनी करत होता. स्पर्धेच्या फायनलमध्ये इओन मोर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने आव्हान दिले होते. या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा २७ धावांनी पराभव केला होता.

२०२२ – गुजरात टायटन्स :

२०२२ झालेल्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात पहिल्यांदाच स्पर्धा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. यावेळी गुजरातचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत होता. स्पर्धेच्या फायनलमध्ये गुजरातने राजस्थानला १३३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला १३० धावाच करता आल्या.

हेही वाचा;

Back to top button