Earthquake In Palghar : पालघरच्या डहाणू, तलासरीमध्ये भूकंपाचे सलग दोन धक्के | पुढारी

Earthquake In Palghar : पालघरच्या डहाणू, तलासरीमध्ये भूकंपाचे सलग दोन धक्के

तलासरी; पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीमध्ये भूकंपाची श्रृंखला सुरूच असून गेले काही महिने थांबलेले भूकंपाची धक्के पुन्हा एकदा सुरू झाले. शनिवारी (दि. २७) संध्याकाळी एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिक भूकंपाच्या धक्क्याने घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले. (Earthquake In Palghar)

डहाणू-तलासरी तालुक्यातील काही गावे भूकंपाने (Earthquake In Palghar) पुन्हा हादरली आहेत. मागील चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूकंप थांबले होते. मात्र, शनिवारी एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का 5 वाजून 15 मिनिटाला 3.3 रिस्टर स्केल, तर दुसरा धक्का 5 वाजून 28 मिनिटाला बसला, रिस्टर स्केलवर त्याची नोंद 3.5 अशी करण्यात आली. जमिनीच्या खाली आठ कि.मी. खोल भूकंप झाल्याची नोंद एनसीएस यांनी केली आहे.

डहाणू, घोलवड, बोर्डी, धुदवाडी, तलासरी ही गावे भूकंपाच्या धक्क्याने हादरली. तसेच गुजरात राज्यातील संजान, उंबरगाव, भिलाड आणि दादरा नगर हवेली येथील सिल्वासापर्यंत हादरे बसले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक घरांना तडे गेल्याने घरांचे नुकसान झाले आहे.

डहाणू, तलासरी परिसरातील गावांना रोजच सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत होते. मात्र, काही महिने ते थांबले होते. आता पुन्हा एकदा भूकंपाने गावे हादरले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डहाणू- तलासरी तालुक्यातील गावामध्ये सातत्याने भूकंप होत होते. काही महिने विश्रांती नंतर पुन्हा शनिवारी सायंकाळी 5 वाजून 15 मिनीटांला 3.3 चा पहिला आणि 5.28 मिनीटांला दुसरा धक्का होऊन जमीन चांगलीच हादरली़. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. सुरक्षित स्थळी थोडा वेळ थांबल्यानंतर पुन्हा घरात गेले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वातावरणात उष्णता वाढल्याने नागरिकांना भूकंपाची भीती वाटत असूनही उकाडा होत असल्याने घराबाहेर झोपता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना भीतीच्या सावटाखाली दिवस काढावे लागत आहे.

हेही वाचा

Back to top button