ऋषभ पंत याला धोनीने दिला गुरुमंत्र | पुढारी

ऋषभ पंत याला धोनीने दिला गुरुमंत्र

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी सराव सामना झाला. या लढतीमध्ये टीम इंडियाने विजय मिळविला. या लढतीवेळी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना टीम इंडियाचा मेंटॉर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र विद्यमान यष्टिरक्षक ऋषभ पंत याचा चांगलाच क्लास घेत होता. यावेळी धोनी ऋषभ पंत याला यष्टिरक्षणाशी संबंधित अनेक टिप्स देत होता आणि पंतही त्यावर काम करताना दिसत होता. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेनंतर टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी धोनी आता मेंटॉर म्हणून टीम इंडियाला सेवा देत आहे. यष्टिरक्षक पंतला धोनीचा वारसदार म्हणून ओळखण्यात येत आहे. मात्र, सुरुवातीला पंत हा फॉर्ममुळे कधी संघात तर कधी बाहेर होत होता. मात्र, त्याने गेल्या काही महिन्यांत क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत शानदार कामगिरी करीत टीम इंडियाचा यष्टिरक्षक म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. यामुळे पंतकडून टी-20 वर्ल्डकपमध्ये संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारताचा पहिला सामना 24 रोजी पाकविरुद्ध होणार आहे. धोनीच्या मार्गदर्शनाखाली पंत आपले यष्टिरक्षण सुधारून आणखी चांगली कामगिरी करण्यास सज्ज होत आहे.

Back to top button