GT vs MI Qualifier 2 : मुंबई इंडियन्सला पावसाचा दणका, फायनलची वाट खडतर; गुजरात मात्र खुशीत | पुढारी

GT vs MI Qualifier 2 : मुंबई इंडियन्सला पावसाचा दणका, फायनलची वाट खडतर; गुजरात मात्र खुशीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : GT vs MI Qualifier 2 : आयपीएलचा दुसरा क्वालिफायर शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. पावसामुळे नाणेफेक अद्याप झालेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह चाहते टेन्शनमध्ये आले आहे. कारण जर पाऊस असाच चालू राहिला तर मात्र या संघाचा फायनलचा मार्ग खडतर होणार आहे.

आयपीएलमध्ये गुजरात आणि मुंबई संघांमध्ये तीनदा लढती झाल्या असून यात मुंबईचा वरचष्मा राहिला आहे. एमआयने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर गुजरातला केवळ एकाअ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

दरम्यान, बदलत्या हवामानाचा फटका आजच्या क्वालीफायर 2 सामन्याला बसला आणि पावसामुळे सामना रद्द झाला तर पुढे काय होईल याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चलातर मग जाणून घेऊया आज अहमदाबादमधील हवामानाची स्थिती काय असेल…

पाऊस पडला तर काय होईल? (GT vs MI Qualifier 2)

प्लेऑफ सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. अशा स्थितीत सामन्याच्या निकालाचा निर्णय त्याच दिवशी होणार हे निश्चित आहे. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास अतिरिक्त वेळ दिला जातो. पाऊस थांबण्याची प्रतीक्षा केली जाते. त्यानंतर किमान पा-पाच षटकांचा सामना खेळवला जावा याचे नियोजन केले जाते. त्यानंतरही पाऊस थांबला नाही आणि जेव्हा प्लेईंग कंडीशनच्या शेवटी पाऊस थांबल्यास सुपरओव्हर म्हणजेच एक-एक षटकाच्या खेळातून निकाल लावण्याचा प्रयत्न केला जातो.

जर सामना रद्द झाला तर साखळी फेरीतील दोन्ही संघांचे स्थान निर्णायक ठरेल. साखळी फेरीदरम्यान जो संघ शीर्षस्थानी होता त्या संघाला विजेता घोषित करून पुढील फेरीत पोहचवले जाईल. म्हणजेच आज सामना जर रद्द झाला तर याचा फायदा गुजरात टायटन्सला होणार आहे. कारण हा संघ गुणतालिकेत अव्वल होता. तर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता.

अहमदाबादमधील हवामान परिस्थिती काय आहे?

अहमदाबादमध्ये शुक्रवारी पावसाची शक्यता कमी आहे. हवामान स्वच्छ आणि खेळण्यासाठी उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे 26 मे रोजी दिवसाचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. दिवसा आणि रात्री आकाश निरभ्र राहील, दिवसा 23 टक्के आणि रात्री 16 टक्के पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत पावसाचा खेळावर काहीसा परिणाम होऊ शकतो. दिवसा आर्द्रता 46 टक्के राहील आणि रात्री 59 टक्क्यांपर्यंत घसरेल. अशा स्थितीत अहमदाबादमधील परिस्थिती खेळासाठी अनुकूल आहे, असे म्हणता येईल, असे सांगण्यात आले आहे. (GT vs MI Qualifier 2)

पिच रिपोर्ट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना खूप मदत करेल. त्यामुळे मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्यात उच्च धावसंख्येचे रेकॉर्ड मोडले जाईल असा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडा स्विंग मिळेल. तसेच बाऊन्ससाठी प्रयत्न करणा-या वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीचा फायदा होईल. जसजसा सामना पुढे जाईल तसतशी फिरकीपटूंना थोडी मदत मिळू शकते. दव हा एक मोठा घटक असू शकतो आणि यामुळे कर्णधार नाणेफेक जिंकून आव्हानाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 167 इतकी आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आयपीएल रेकॉर्ड आणि आकडेवारी

आयपीएलचे एकूण सामने : 25
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय : 12 वेळा
धावांचा पाठलाग करणा-या संघाचा विजय : 13 वेळा
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या : 167
सरासरी पॉवरप्ले स्कोअर : 47
शेवटच्या 5 सामन्यांतील सरासरी डेथ ओव्हर स्कोअर : 50

‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष

शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्यासाठी हे मैदान लकी आहे. त्याने येथे 10 सामन्यांत 62.63 ची सरासरी आणि 147.35 च्या स्ट्राईक रेटने 501 धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलरने येथे 41.60 च्या सरासरीने आणि 167.74 च्या स्ट्राइक रेटने 208 धावा केल्या आहेत. तर मोहम्मद शमीने या स्टेडियमवर 16.22 च्या सरासरीने 18 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत या सर्वांच्या कामगिरीवर लक्ष असेल यात शंका नाही.

Back to top button