WTC Final जिंकणा-या संघाला मिळणार सुमारे 13.2 कोटी! ICC ची घोषणा | पुढारी

WTC Final जिंकणा-या संघाला मिळणार सुमारे 13.2 कोटी! ICC ची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून डब्ल्यूटीसीचा अंतिम (WTC Final) सामना सुरू होणार आहे. दरम्यान, आयसीसीने या सामन्यापूर्वी विजेत्या संघावर किती पैशांचा वर्षाव केला जाईल आणि उपविजेत्या संघाला किती पैसे दिले जातील याची घोषणा केली.

बक्षिसाच्या रकमेत कोणताही बदल नाही

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ICC ने दिलेल्या माहितीनुसार, WTC फायनल जिंकणाऱ्या संघाला जवळपास 13.23 कोटी तर पराभूत संघाला 6.61 कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. मागील पर्वाच्या तुलनेत यावेळी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डब्ल्यूटीएसी 2019-21 च्या अंतिम फेरीपूर्वी विजेत्या संघांसाठी बक्षीसाची रक्कम निश्चित करण्यात आली होती. WTC चे पहिले पर्व न्यूझीलंडने जिंकून इतिहास रचला होता. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघाने विजेतेपदाच्या लढतीत भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता.

द. आफ्रिका, इंग्लंड आणि श्रीलंकेला किती रक्कम मिळणार?

यंदाच्या पर्वात द. आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. या संघाला सुमारे साडेतीन कोटी रुपये मिळणार आहेत. इंग्लंडचा संघाला यावेळी 46.96 गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी इंग्लिश संघाच्या खात्यात सुमारे 2.8 कोटी रुपये जमा होणार आहेत. तर पाचव्या स्थानावर स्पर्धेचा प्रवास संपवणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला जवळपास 1.6 कोटी रुपये मिळणार असल्याचे, आयसीसीने जाहीर केले आहे.

इतर संघांना सुमारे 82-82 लाख रुपये मिळणार

डब्ल्यूटीसी 2021-23 मध्ये एकूण 9 संघांनी भाग घेतला. गतविजेत्या न्यूझीलंडने यावेळी निराशा केली आणि त्यांना 13 पैकी केवळ 4 कसोटी सामने जिंकता आले. किवीजची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली. त्यापाठोपाठ पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे संघ अनुक्रमे 7व्या, 8व्या आणि 9व्या स्थानावर राहिले. गुणतालिकेतील या तळातील संघांना यावेळी सुमारे 82-82 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल असेही आयसीसीने म्हटले आहे.

टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा WTC Final खेळण्यासाठी सज्ज

गत उपविजेता भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. टीम इंडियाने डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या पर्वात 10 सामने जिंकले असून त्यांना 5 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. याशिवाय 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीस संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे अव्वल स्थानी असणा-या ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत.

WTC Final 2023 साठी दोन्ही संघांचे खेळाडू :

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , जयदेव उनाडकट.
स्टँडबाय खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.

डब्ल्यूटीसी फायनलचे थेट प्रक्षेपण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे प्रसारण अधिकार आयसीसीने फार पूर्वीच घोषित केले आहेत. भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील चाहत्यांचा सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये फॉक्स स्पोर्ट्स, कायो आणि ‘आयसीसी डॉट टीव्ही’वर या सामन्याचे प्रसारण केले जाईल.

Back to top button