GT vs MI Qualifier 2: ‘हे’ पाच खेळाडू ठरवतील सामन्याचा निकाल! | पुढारी

GT vs MI Qualifier 2: ‘हे’ पाच खेळाडू ठरवतील सामन्याचा निकाल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : GT vs MI Qualifier 2 : आयपीएल 2023 चा क्वालिफायर-2 सामना गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळवला जाणार आहे. अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुक्रवारी (दि. 26) हा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजयी संघ आपसूकच अंतिम फेरीत पोहेचेल जिथे त्यांची लढत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK)शी होणार आहे. हा सामना येत्या रविवारी 28 मे रोजी खेळवला जाणार आहे.

क्वालीफायर दोन मुंबई आणि गुजरात संघांच्या चाहत्यांना एकप्रकारे सेमीफायनलच ठरणार आहे. या दोन्ही संघापैकी कोणता संघ अंतिम फेरीत जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांना त्यांच्या खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. यासोबतच सर्व चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंकडूनही सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. क्वालिफायर 2 चा निकाल ठरवण्याची क्षमता असलेल्या अशा पाच खेळाडूंवर आपण एक नजर टाकूया. (GT vs MI Qualifier 2)

1. शुभमन गिल

गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल सातत्याने धावा करत आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील 15 सामन्यांमध्ये त्याने 149.17 च्या स्ट्राइक रेटने आणि 55.54 च्या सरासरीने 722 धावा केल्या असून त्याच्या बॅटमधून सलग दोन शतके झळकावली आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याची बॅट तळपेल अशी अपेक्षा आहे.

2. सूर्यकुमार यादव

सूर्या स्पर्धेच्या सुरुवातीला त्याच्या फॉर्मशी झुंजत होता परंतु लीगच्या उत्तरार्धात त्याला त्याचा जुना फॉर्म गवसला आहे. यंदाच्या हंगामात त्याच्या बॅटने आतापर्यंत चार अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. त्याने 15 सामन्यात 41.85 च्या सरासरीने आणि 183.78 च्या स्ट्राईक रेटने 544 धावा केल्या आहेत. मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखल्या जाणा-या या फलंदाजाची वादळी खेळी पुन्हा एकदा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. (GT vs MI Qualifier 2)

3. मोहम्मद शमी

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या मोहम्मद शमीच्या नावावर आतापर्यंत 26 बळी आहेत. शमीने 17.38 च्या सरासरीने आणि 7.66 च्या इकॉनॉमीने शानदार गोलंदाजी केली आहे. शमीकडे आयपीएल 2023 ची पर्पल कॅप आहे.

4. राशिद खान

अफगाणिस्तानचा अष्टपैलू असणा-या राशिद खानच्या फिरकी गोलंदाजीची जादू फलंदाजांसाठी डोकेदुखी झाली आहे. या मोसमात आतापर्यंत त्याने 7.92 च्या इकॉनॉमी आणि 19.00 च्या सरासरीने 25 विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅप्सच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 16 व्या हंगामात त्याच्या नावावर हॅटट्रिक घेण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.

5. आकाश मधवाल

मुंबई इंडियन्सला आणखी एक घातक गोलंदाज सापडला आहे. एलिमिनेटर सामन्यात लखनौच्या डावाला खिंडार पाडणा-या या गोलंदाजाने पाच धावांत पाच बळी घेतले. जोफ्रा आर्चरच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या आकाशने अद्यापही आपल्या कामगिरीने संघाची निराशा केलेली नाही. आकाश आतापर्यंत 7 सामन्यात 13 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. (GT vs MI Qualifier 2)

Back to top button