Rinku Singh : ‘हारकर जीतने वाले को रिंकू सिंह कहते हैं’, LSGच्या विजयापेक्षा यूपीच्या पोराचीच जास्त चर्चा | पुढारी

Rinku Singh : ‘हारकर जीतने वाले को रिंकू सिंह कहते हैं’, LSGच्या विजयापेक्षा यूपीच्या पोराचीच जास्त चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 68 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंगने (Rinku Singh) आणखी एक तुफानी खेळी करत क्रीडा चाहत्यांच्या मनाचा थरकाप उडवला. यंदाच्या मोसमात धावांचा पाठलाग करताना रिंकूची बॅट तळपली आहे. शनिवारीही (दि. 20) लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG) या सामन्यात त्याचा प्रत्यय आला. शेवटच्या दोन षटकात केकेआरला विजयासाठी 41 धावांची गरज होती. विजयापासून खूप दूर असलेल्या केकेआरसाठी रिंकूने एकहाती सामना जिंकण्याची आशा जागवली. पण दुर्दैवाने अवघ्या एक रनने त्यांना सामना गमवावा लागला. लखनौचा निसटता विजय झाला असला तरी डावखुरा रिंकू सिंह बाजीगर ठरला.

रिंकू सिंहने (Rinku Singh) एलएसजीविरुद्धच्या सामन्यात 67 धावांची धडाकेबाज खेळी करून केवळ एक सामनाच नाही तर कोणताही सामना बदलण्याची क्षमता आपल्यात आहे हे सिद्ध केले. त्याने 33 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 67 धावा केल्या. लीग टप्प्यातील अंतिम सामन्यांमध्ये एलएसजी (LSG) आणि केकेआर (KKR) यांच्यात सामना झाला. या रोमांचक सामन्यात कृणाल पंड्याच्या लखनौने 1 रनने निसटता विजय मिळवला. केकेआरला विजय मिळवून देण्याच्या संघर्षमय सामन्यात रिंकूने एलएसजीच्या गोलंदाजांची कुटाई केली. पण, तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अवघ्या 1 रनने कमी पडला.

सामन्याच्या शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी 21 धावांची गरज होती. शेवटच्या षटकात यश ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर वैभव अरोराने एक धाव घेतली आणि रिंकूला स्ट्राईक दिले. त्यानंतर पुढचा चेंडू वाईड झाला. त्यानंतर रिंकूने दोन डॉट बॉल खेळले. यानंतर यश ठाकूरने आणखी एक वाईड चेंडू टाकला. केकेआरला शेवटच्या तीन चेंडूत 18 धावांची गरज होती.

रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात जसे सलग पाच षटकार मारून केकेआरला विजय मिळवून दिला होता त्याच चमत्काराची पुनरावृत्ती तो लखनौविरुद्धच्या सामन्यात करेल, अशी आशा विश्वास चाहत्यांना वाटत होता. सुरुवात तशीच झाली. यश ठाकूरने चौथा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याची लेन्थ योग्य नव्हती आणि रिंकूने हा चेंडू डीप-मिडविकेटवर फटकावला. चेंडू थेठ प्रेक्ष गॅलरीत पोहला. केकेआरला दोन चेंडूत 12 धावा करायच्या होत्या. यशने पुन्हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो वाईड होता, ज्यावर रिंकूला केवळ चौकार मारण्यात यश आले. म्हणजेच केकेआरला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर आठ धावांची गरज होती, जी जवळपास अशक्य होती. मात्र, रिंकूने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून सामना शानदारपणे संपवला.

Back to top button