Virat Kohli vs Naveen : विराटला ‘खुन्‍नस’ देणारा नवीन-उल-हक आहे तरी कोण? यापूर्वीही वादामुळेच चर्चेत | पुढारी

Virat Kohli vs Naveen : विराटला 'खुन्‍नस' देणारा नवीन-उल-हक आहे तरी कोण? यापूर्वीही वादामुळेच चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्‍याबरोबर आयपीएल सामन्‍यात वाद घालणारा नवीन-उल-हक पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. नवीन-उल-हक आणि वाद हे समीकरण जुने आहे. यापूर्वीही मैदानावर घातलेल्‍या वादामुळे तो चर्चेत राहिला आहे. ( Virat Kohli vs Naveen ) जाणून घेवूया नवीन उल हकविषयी…

२३ वर्षीय नवीन-उल-हक हा अफगाणिस्‍तानचा वेगवान गोलंदाज आहे. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्‍पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळतो. नवीन-उल-हकची अनेकदा वरिष्ठ खेळाडूंशी भांडणे झाली आहेत. श्रीलंका प्रीमियर लीग असो किंवा पाकिस्तान सुपर लीग. त्याची अनेकदा वरिष्ठ खेळाडूंशी भांडणे झाली आहेत. एलपीएलमध्ये तो थिसारा परेराशी भिडला होता. तर पीएसएलमध्ये तो मोहम्मद अमीर आणि शाहिद आफ्रिदीसोबत वादावादी झाली होती.

Virat Kohli vs Naveen : विराटशी वाद आणि नवीन-उल-हक पुन्‍हा चर्चेत

सोमवारी लखनौ सुपर जायंट्स आणि आरसीबी सामन्‍यावेळी नवीन-उल-हक हा विराट कोहलीशी भिडला. नवीन फलंदाजी करत असताना विराट आणि त्याच्यात काही संवाद झाला. पंचांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण नवीन थांबत नव्हता. मॅचनंतर हे प्रकरण आणखी वाढले, हातवारे करत विराट आणि नवीनमध्ये बाचाबाची झाली. यानंतर प्रकरण इथेच संपले नाही तर नवीनमुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही वादावादी झाल्‍याचे पाहायला मिळाले. केएल राहुल आणि विराट कोहली बोलत होते, तेव्हा केएल राहुलला नवीन आणि विराटमधील प्रकरण मिटवायचे होते. नवीनला विराटला सॉरी म्हणायला सांगितले, तरीही तो आपल्‍याच मतावर ठाम राहिल्‍याचे दिसले. सामन्यानंतर विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांना दंड ठोठावण्यात आला आहे. नवीनला 50 आणि गंभीर आणि विराटला 100-100 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शाहिद आफ्रिदी आणि मोहम्‍मद अमीरशीही झाला होता वाद

विराटबरोबर झालेल्‍या बाचाबाचीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला नवीन उल हक यापूर्वीही आपल्‍या वादग्रस्‍त वर्तनामुळे चर्चेत राहिला आहे. २०२० मध्‍ये श्रीलंका प्रीमियर लीगच्‍या सामन्‍यात त्‍याने मोहम्‍मद अमीर आणि शाहिद आफ्रिदीसोबत वाद घातला होता. या सामन्‍यात १८ व्‍या षटकात मोहम्‍मद अमीर फलंदाजी करत होता. त्‍याने नवीनच्‍या गोलंदाजीवर चौकार मारला. यानंतर दोघांमध्‍ये वाद झाला. त्‍यावेळी त्‍याने मोहम्‍मद अमीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्‍याशी वाद घातला. ‘ बेटा, तुझ्‍या जन्‍माच्‍या आधी मी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये शतक ठोकले आहे’ , असे खडेबोल आफ्रिदीने त्‍याला सुनावले होते. सामना झाल्‍यानंतर सर्व खेळाडू एकमेकांना हस्‍तांदोलन करताना आफ्रिदी आणि नवीन यांच्‍या पुन्‍हा एकदा जोरात वाद झाला.

सामना खेळा आणि असभ्य भाषा वापरू नका…

वाद झाल्‍यानंतर दुसऱ्याच दिवशी आफ्रिदीने ट्विटरवर या लढतीचा समाचार घेतला. स्काय स्पोर्ट्सने हँडशेक दरम्यान दोघांच्या वादाचा व्हिडिओ ट्विट केला होता. आफ्रिदीने रिट्विट करत लिहिलं होतं की, “मला तरुण खेळाडूसाठी एक साधा सल्ला होता. सामना खेळा आणि असभ्य भाषा वापरू नका. अफगाणिस्तान संघात माझे अनेक मित्र आहेत आणि आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. संघसहकाऱ्यांचा आणि प्रतिस्पर्ध्याचा आदर करणे ही खेळाची मूलभूत भावना आहे, असेही शाहिद आफ्रिदीने म्‍हटले होते.

आफ्रिदीच्‍या ट्विटला नवीन उल हकने दिले होते प्रत्‍युत्तर

आफ्रिदीच्या ट्विटनंतर नवीन-उल-हकही शांत बसला नाही. त्‍याने आफ्रिदीच्या ट्विटवर कमेंट करताना लिहलं होतं की, सल्ला आणि आदर घ्यायला नेहमी तयार. क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे, पण जर कोणी म्हणत असेल की, तू आमच्या पायाखाली आहेस आणि नेहमी तिथे राहशील,र याचा अर्थ तो फक्त माझ्याबद्दलच नाही तर माझ्‍या देशाच्या लोकांबद्दल बोलत होता.”, यासोबतच नवीनने काही हॅशटॅगचा वापर केला. ज्यात त्यांनी लिहिले, आदर द्या, आदर घ्या. यानंतर या दोघांमधील वादाची अनेक दिवस ट्विटरवर चर्चा होती. या वादामुळे नवीन उल हक मोठ्या प्रमाणावर चर्चेत आल होता.

हेही वाचा : 

 

Back to top button