SL vs IER Test : श्रीलंकेचा 100 वा कसोटी विजय, आयर्लंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली | पुढारी

SL vs IER Test : श्रीलंकेचा 100 वा कसोटी विजय, आयर्लंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : SL vs IER Test : गॅले कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेने आयर्लंडचा एक डाव आणि 10 धावांनी पराभव करून मालिका 2-0 ने खिशात घातली. श्रीलंकेचा हा 100 वा कसोटी विजय ठरला आहे.

आयर्लंडने पहिल्या डावात 492 धावा केल्या. याला श्रीलंकेने चोख प्रतुत्तर दिले आणि 3 बाद 703 धावा करून डाव घोषित केला. निसांका मधुष्काने 205 आणि कुसल मेंडिसने 245 धावा केल्या. या दोघांशिवाय कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 115 तर अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 100 धावा केल्या. श्रीलंकेकडून आघाडीच्या चार फलंदाजांनी शतके झळकावली.

याबरोबर यजमान संघाने पहिल्या डावात 212 धावांची आघाडी घेतली. मात्र, या आघाडीचा पाठलाग करताना आयर्लंडचा दुसरा डाव गडगडला. ते 202 धावांपर्यंतच मजल मारू शकले. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरने 85 धावांचे योगदान दिले.

संबंधित बातम्या

एकवेळ हा सामना ड्रॉ होईल असे वाटत होते, पण रमेश मेंडिस आणि असिथा फर्नांडो यांच्या गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने सामना जिंकला. प्रभात जयसूर्याला सामनावीर आणि कुसल मेंडिसला मालिकावीर घोषित करण्यात आले.

श्रीलंकेने पहिला कसोटी सामना तीन दिवसांत एकतर्फी जिंकला होता, पण दुसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेने विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह श्रीलंकेने भारताचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

एका डावाने विजय मिळविल्यानंतर पहिल्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी भारताच्या नावावर होता. 2016 मध्ये चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 477 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 7 विकेट गमावून 759 धावांवर डाव घोषित केला होता. अखेर तो सामना भारताने एक डाव आणि 75 धावांनी जिंकला होता.

Back to top button