Prabath Jayasuriya : प्रभात जयसूर्याचे वेगवान बळींचे अर्धशतक, मोडला 72 वर्षांपूर्वीचा विक्रम! | पुढारी

Prabath Jayasuriya : प्रभात जयसूर्याचे वेगवान बळींचे अर्धशतक, मोडला 72 वर्षांपूर्वीचा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने (Prabath Jayasuriya) आयर्लंडविरुद्ध गॉल कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली. त्याने फिरकी गोलंदाज म्हणून कसोटी सामन्यात सर्वात जलद 50 विकेट्स घेण्याचा 72 वर्ष जुना विक्रम मोडला. त्याने 7 कसोटींच्या 13 डावांमध्ये हा टप्पा गाठाला. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी त्याने आयर्लंडचा स्टार फलंदाज पॉल स्टर्लिंगची विकेट घेत बळींचे अर्धशतक पूर्ण केले.

याआधी वेस्ट इंडिजचे माजी फिरकीपटू अल्फ व्हॅलेंटाइन यांच्या नावावर हा विक्रम होता. 31 डिसेंबर 1951 रोजी व्हॅलेंटाइनने हा विक्रम रचाला होता. त्याने 8 कसोटीत 50 बळी घेतले होते. पण श्रीलंकेच्या जयसूर्याने व्हॅलेंटाइन यांचा विक्रम मोडीत काढून केवळ 7व्या कसोटीत 50 फलंदाजांना तंबूत पाठवण्याची किमया केली आहे. याशिवाय जयसूर्याने (Prabath Jayasuriya) आता दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज व्हर्नन फिलँडर आणि इंग्लंडचे माजी गोलंदाज टॉम रिचर्डसन यांच्याशी बरोबरी साधली आहे. या दोन्ही माजी दिग्गजांनी वेगवान गोलंदाज म्हणून 7 सामन्यांमध्ये बळीचे अर्धशतक पूर्ण केले होते.

माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज चार्ली टर्नर यांच्या नावावर आजही सर्वात जलद बळींचे अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम आहे. त्यांनी अवघ्या सहा सामन्यांत 50 बळी घेतले होते. विशेष म्हणजे 1888 मध्ये त्यांनी हा विक्रम केला होता आणि 135 वर्षांनंतरही तो कोणीही मोडू शकलेले नाही.

कसोटीत 50 बळी घेणारे सर्वात वेगवान गोलंदाज

चार्ली टर्नर (ऑस्ट्रेलिया) : 6 सामने, 1887-1888
प्रभात जयसूर्या (श्रीलंका) : 7 सामने, 2022-2023
व्हर्नन फिलँडर (दक्षिण आफ्रिका) : 7 सामने, 2011-2012
टॉम रिचर्डसन (इंग्लंड) : 7 सामने, 1893-1896
टेरी अल्डरमन (ऑस्ट्रेलिया) : 8 सामने, 1981
रॉडनी हॉग (ऑस्ट्रेलिया) : 8 सामने, 1978–1979
अल्फ व्हॅलेंटाईन (वेस्ट इंडिज) : 8 सामने, 1950–1951
फ्रेडरिक स्पॉफॉर्थ (ऑस्ट्रेलिया) : 8 सामने, 1877-1883

जयसूर्याने (Prabath Jayasuriya) एका इनिंगमध्ये 6 वेळा 5 विकेट्स आणि एका सामन्यात दोनवेळा 10 विकेट्स घेण्याची किमया केली आहे. त्याने जर आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले तर तो सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो. हा विक्रम सध्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉर्ज लोहमन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1896 मध्ये आपल्या 16व्या कसोटीत बळींचे शतक गाठले होते.

Back to top button