Wrestlers’ Protest: WFI च्या वादात ‘पी. टी. उषा’ यांच्यावर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंचा टीकेचा भडिमार | पुढारी

Wrestlers' Protest: WFI च्या वादात 'पी. टी. उषा' यांच्यावर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंचा टीकेचा भडिमार

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली: भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात कुस्तीपट्टु जंतर मंतरवर आंदोलनास बसले आहेत. या कुस्तीपटूंनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्या विधानावर नाराजी व्यक्त (Wrestlers’ Protest) करीत टीकेचा भडीमार केला आहे. ‘कुस्तीपटूंनी धरणे आंदोलन केल्यामुळे देशाची बदनामी झाली आहे…’ असे विधान पी. टी. उषा यांनी केले होते.

कुस्तीपटूंनी आंदोलन करण्यापूर्वी आपली तक्रार भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अॅथलिट आयोगाकडे द्यावयास हवी होती. त्यांच्या आंदोलनामुळे देशाची बदनामी झाली आहे. तसेच ही अनुशासनहीनता असल्याचे पी. टी. उषा यांनी म्हटले होते. उषा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी ‘पी. टी. उषा (Wrestlers’ Protest) या स्वतः एक खेळाडू आहेत. अशावेळी त्यांनी केलेले वक्तव्य ऐकून वाईट वाटले’ अशी भावना व्यक्त केली आहे.

‘एका महिला खेळाडूकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती’, अशी प्रतिक्रिया गीता फोगट यांनी दिली. ‘आम्ही अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. आम्ही आता विरोधही करु शकत नाही का?’, असा सवाल देखील साक्षी मलिक यांनी विचारला आहे. तर ‘पी. टी. उषा यांच्याबाबतीत असा प्रकार झाला असता, तर त्यांनी इतकी वाट पाहिली असता का?’, असा सवाल विनेश फोगट यांनी उपस्थित केला आहे.

Wrestlers’ Protest: पी. टी. उषा यांच्या वक्तव्याचे राजकीय क्षेत्रातही पडसाद

पी. टी. उषा यांच्या वक्तव्याचे राजकीय क्षेत्रातही पडसाद (Wrestlers’ Protest) उमटले आहेत. ‘पी.टी. उषा यांनी एक महिला असूनही, महिलांचे दुःख जाणून घेतले नाही. या प्रकरणातून त्यांना काय गुलाबाचा वास येत आहे का’, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या नेत्या खा. मोहुआ मोईत्रा यांनी केली. तर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला एक खासदार वाचतो, तर दुसरीकडे पीडीतांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, अशावेळी देशाची प्रतिमा मलिन होते’ असे सांगितले आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर तसेच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी देखील या मुद्द्यावर कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button